कृष्णा सोनरवाडकर, मुंबई | राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या किचनपर्यंत घुसखोरी करत थेट अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनाच ब्लॅकमेल करण्याचं प्रकरण राज्यात सध्या खळबळ माजवतंय. पोलिसांनी या प्रकरणी आज महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिंघानी याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. कुख्यात क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या मोस्ट वाँटेड लीस्टमध्ये होता. त्यातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल जयसिंघानी याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. आज अखेर अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या अटकेसाठी विशेष ऑपरेशन एजे राबवलं. ७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे ऑपरेशन फत्ते झालं.
अनिल जयसिंघानी याच्या अटकेसाठी पोलिसांनी ऑपरेशन एजेचा प्लॅन आखला होता. या ऑपरेशनसाठी पाच विशेष पथक बनवण्यात आली होती. अनिल जयसिंघानी वारंवार लोकेशन बदलत होता त्यानुसार तांत्रिक बाबींच्या आधारे पोलीस त्याचा माग काढत होते. जयसिंघानी शिर्डी, नाशिक, मिरारोड असा प्रवास करून गुजरातला गेला. ज्या दिवशी त्याची मुलगी अनिक्षा हिला अटक झाली, त्याच दिवशी 16 मार्च रोजी तो मिरारोडमध्ये होता…
अनिल जयसिंघानी गुजरातला गेल्याचं कळताच मुंबई पोलिसांच्या 10 टीम गुजरातला रवाना झाल्या. गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याला शोधायला सुरवात करण्यात आली. तब्बल 72 तास तो गुजरातमध्ये पोलिसांना चकवा देत होता. गुजरातच्या गोध्रा परिसरात त्याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. जयसिंघानीकडे अनेक मोबाईल्स,आणि इंटरनेट पुरवणारी यंत्रणा सोबत होती. पोलिसांनी जयसिंघानीसोबत असणाऱ्या त्याच्या ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे.
गुजरातमध्ये अनिल जयसिंघानीसोबत अन्य दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यात ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती आहे. जयसिंघानिया सोबत असणारी तिसरी व्यक्ती ही अनिक्षाचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हे शाखेने जयसिंघनियाला अटक करून मलबार हिल पोलिसांच्या स्वाधीन केलंय. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणाऱ्या या घटनेत पुढे आणखी काय धागेदोरे हाती येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
अनिल जयसिंघानीला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाती लागण्याची शक्यता आहे. थेट देवेंद्र फडणवीस यांच्या घरात पोहोचून अनिल जयसिंघानीला नेमकं काय हवं होतं? यामागे काही राजकीय षडयंत्र होतं का? महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून अनिक्षा ही अमृता फडणवीस यांच्या वारंवार संपर्कात होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत..’ या आरोपांशी या घटनेचा काही संबंध आहे का, असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी या अटकेवरून उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांचा नेमका काय संबंध आहे, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.