मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | मणिपूरच्या घटनेने देशाला कलंक लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण नाव घेतो, आदराने लिहितो. छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद भाजप के साथ असे म्हणताना यांना लाज वाटत नाही का? कर्नाटकमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कडेला ठेवला म्हणून पडलेल्या आमदाराने मोर्चा काढला. मागे शिवरायांच्या पुतळ्यावर शाई फेकली तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यतचे सगळे गप्प का होते? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी केला.
दिल्लीत संसदेचे अधिवेशन झाले. अधिवेशन कसले झालं, तमाशाचं झालं… अधिवेशन काळात दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक रेल्वे अपघात आणि दुसरी मणिपूरची घटना. मणिपुरमध्ये हिंसाचार चालू असताना सरकारने वेळेत पाऊल उचलले नाही. भाजपची पितृ संस्था देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हती. हिंदू, मुसलमान दंगे घडवायचे हे त्यांचे धोरण आहे. मणिपूरमध्ये जी बीजे पेरली ती भाजपची आहेत, असा आरोपही सावंत यांनी केला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली. मात्र, रेल्वेने तशी आमची पॉलिसि नाही असे सांगितले. शिवसेनेचा खासदार आहे म्हणून त्यांनी परवानगी दिली नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्रवरती अन्याय होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी उध्वस्त होत आहे. त्याच्याविषयी कोणतेही धोरण नाही हे लोकांच्या नजरेला आणावं लागेल, असे ते म्हणाले.
आज मिंद्याचे पोरगं आम्हाला हिंदुत्व शिकवतयं. महाराष्ट्र संयुक्त राष्ट्र झालं. मात्र, अजूनही बेळगाव, कारवार, निपाणी, भीदर, भालकी तिकडे कर्नाटकात आहे. स्वतःला डबल इंजिन म्हणायला यांना लाज नाही वाटत? अशी टीका त्यांनी केली.
लोकशाहीला मानत नाही म्हणून निवडणुका होत नाही. यापुढे विधानसभा निवडणूक असु दे किंवा खासदारकीची निवडणूक असू दे. या सगळ्या निवडणुकीमध्ये ह्यांना पपहिले बाहेर काढणार. मुंबईतील आलात तुम्हाला सामावून घेतलं. पण, आमच्या डोक्यावर बसून तुम्हाला मिऱ्या वाटू देणार नाही, असा इशाराही खासदार सावंत यांनी भाजपला दिला.
लोकांच्या मनामध्ये काय आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे. ती कुणाला समजली की नाही हे पाहण्यासाठी, कुणाच्या मनात काही शंका असल्या तर त्याचे निराकरण करण्यासाठी राज्यात दौरा करणार आहे. यामधून खोटारड्या लोकांचा खोटेपणा समोर आणणार आहे. लोकशाही खड्ड्यात घालायचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आम्ही लगाम घालणार आहोत असेही त्यांनी ठणकावले.