भंडारा : भंडारा वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात लाच घेतात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खिसेकापू पोलीस बसलेले असतात. तिथं जाणाऱ्या वाहन चालकांना मोटार वाहन कायद्याचा धाक दाखवतात. एखादा कागदपत्र कमी असल्यात त्याला अडकवतात. हे सारे मोटार वाहन कायद्याचे नियम सामान्य चालकाला समजत नाही. मग, या वाहतूक पोलिसांचे चांगले फावते. तिथून कुणी सुटले, तर समोर जिल्हा परिषद चौकात दुसरे वाहतूक पोलीस वाहन चालकाचे खिसे कापण्यासाठी तैनात असतात. बकरा आला की, कापा, हे वाहतूक पोलीस एकमेकांना फोनवरून बकरा आला की त्याचा माहिती देतात. आणि मोटार वाहन कायद्याचा धाक दाखवून लुटमार करतात.
मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाईतून नाव वगळण्यासाठी भंडारा पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षकानं लाच मागितली. 10 हजारांची लाच रक्कम घेताना सहायक पोलीस निरीक्षक राजेश साठवणे (वय 45) याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई मध्यरात्री भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली. या कारवाईनं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे 53 वर्षांचे आहेत. त्यांचा मुलगा आणि अन्य तिघांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, मुलगा हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्याचं नावं कारवाईतून वगळण्याची विनंती वडिलांनी केली. त्यामुळे या सहायक पोलीस निरीक्षकाने थेट दहा हजारांची लाच मागितली.
एवढी रक्कम द्यायची कुठून म्हणून तक्रारदार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गेला. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. बरेच तक्रारदार तक्रार देत नाहीत. त्यामुळे अशा लाचखोर पोलिसांचे चांगलेच फावते. लाचखोर पोलिसांच्या उत्पन्नाची स्त्रोतांची माहिती घेतल्यास किती लाचखोर पोलीस आहेत, हे समोर येईल. पण, यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे अशा लाचखोर पोलिसांचे फावते. यात चांगल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडेही नाईलाजाने नागरिकांना संशयाच्या नजरेतून पाहावे लागते.