औरंगाबाद | 10 ऑगस्ट 2023 : पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांची इंडिया आघाडीही तयार झाली आहे. या इंडिया आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या निवडणुकीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता लोकसभा निवडणुकीबाबत मोठं भाकीत केलं आहे. लोकसभेच्या निवडणुका महिना दीड महिन्यात होतील. दीड महिन्यानंतर विचारा कशा काय होतील? त्यावेळी सांगतो. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागलो आहोत. भाजपच्या विरोधात लढू. आमचे उमेदवार उभे करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी गंभीर आरोप केला. माझा हा आरोपच आहे की मणिपूर हिंसाचार हा अदानीसाठीस सुरू आहे. खनिजावर ताबा हा आदिवासींचा आहे. मैतेई समुहाने आरक्षणाची मागणी केली नाही. अचानकपणे मैतेई समाजाला आदिवासी का घोषित केलं गेलं? संविधानानुसार पहाडी इलाक्यात तिथे आदिवासी कौन्सिल असतात. तिथे काही करायचं असेल तर आदिवासींची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी अदानी आणि इतरांना मायनिंग दिल्या. पण हिल कौन्सिल त्याला मंजुरी देत नाहीये. त्यामुळे या खाणीच्या मंजुरीसाठीच मैतेई समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीशी आमचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेसोबत आमची युती आहेच. महाविकास आघाडीशी आमचा संबंध नाही. त्यामुळे निवडणुकीत काय करायचं हे महाविकास आघाडीने त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. त्यांनी त्यांचं पाहावं. आम्ही का डोकं लावावं? आम्ही का आमचा बीपी वाढवून घ्यावा? आमची आघाडी शिवसेनेसोबत आहे. आमचा समझौता शिवसेनेसोबत होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.