औरंगाबाद | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार यांच्या या विधानामागे काय खेळी आहे? असा सवालही केला जात आहे. भाजपने तर राष्ट्रवादीत फूट पडलीय असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया देऊन या संभ्रमात आणखी भर घातली आहे. हा सर्व धुरळा उडालेला असतानाच ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे.
निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही. मात्र आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करून भाजप सोबत जातात आणि हे त्यांना नेता मानतात, असं दानवे म्हणाले. इंडिया आघाडी काही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनापुरती मर्यादित नसून देशपातळीवर आहे. पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची भूमिका अमच्या पक्ष प्रमुखाकडे सातत्याने मांडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिके बाबत आम्ही पक्षप्रमुखाकडे विचार मांडत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आढावा घेत आहे. शिवसेनेची स्थिती काय? कोण उमेदवार? याचा आढावा घेतला जात आहे. 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.
मोदींसाठी महाराष्ट्र डोकेदुखी ठरणार का? असा सवाल केला असता त्यांनी होय असे उत्तर दिले. राज्यातील 40 लोकसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यामुळे आमची मोदींना डोकेदुखी होणार आहे. मोदींना आमचा धसका घेतला आहे, असा दवा करतानाच मध्यप्रदेशात सिंधिया यांचे जे हाल झाले तसेच हाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात होतील, असा दावा त्यांनी केला.