नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतर्फे राम भक्तांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांना प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ ते माता सीतेचे जन्मस्थळाचा प्रवास करता येईल. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या (Bharat Gaurav Tourist Train) माध्यमातून हे पर्यटन करता येईल. भारतीय रेल्वेने राम भक्तांसाठी ‘श्री राम-जानकी यात्रा: अयोध्या ते नेपाळ-जनकपूर’ अशी धार्मिक यात्रा आयोजित केली आहे. 17 फेब्रुवारी 2023 पासून ही यात्रा सुरु होत आहे. दिल्ली येथून या यात्रेला सुरुवात होत आहे. या ट्रेनच्या माध्यमातून भक्तांना अयोध्या (Ayodhya) ते जनकपूर (Janakpur)अशी यात्रा असेल. यादरम्यानची सर्व धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे.
देशातंर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) पाहा आपला देश या धरतीवर भारत गौरव पर्यटन ट्रेन सुरु केली आहे. या पॅकेजअंतर्गत 7 दिवसांसाठी प्रवास करता येईल. या यात्रेत प्रत्येक व्यक्तीला 39,775 रुपये भाडे द्यावे लागेल.
या पॅकेजमध्ये ट्रेनचा प्रवास, एसी हॉटेलमध्ये रात्री राहण्याची सुविधा, शाकाहारी भोजन, स्थानिक पर्यटनस्थळी जाण्यासाठी बसची व्यवस्था, पर्यटनस्थळ आणि तीर्थस्थळाची यात्रा, विमा आणि गाईडची सुविधा मिळेल. तसेच त्या त्याठिकाणी फिरण्याची हौसही भागविता येईल.
ही ट्रेन दिल्लीवरुन थेट नेपाळमधील जनकपूर इथपर्यंत धावेल. यादरम्यान येणाऱ्या धार्मिकस्थळी देवदर्शन घेता येईल. यामध्ये अयोध्या आणि जनकपूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या निर्णयामुळे भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय संबंध मजबूत होतील. त्यासाठी ही यात्रा महत्वाची आहे.
ही ट्रेन नंदीग्राम, सीतामढी, काशी आणि प्रयागराज येथून जाणार आहे. जनकपूर आणि वाराणसी येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक डिलक्स एसी ट्रेन आहे. यामध्ये दोन रेस्टॉरंट, आधुनिक स्वयंपाकघर, आंघोळीची व्यवस्था, पायांच्या मालिशची व्यवस्था आहे.
बिहार येथील सीतामढीपर्यंतचा प्रवास या विशेष रेल्वेने होईल. त्यानंतरचा जनकपूरपर्यंतचा प्रवास बसने करावा लागेल. सीतामढी ते जनकपूर हे अंतर 70 किलोमीटर आहे. या प्रवासात पर्यटकांना विविध मंदिरांना भेट देता येईल आणि देवदर्शनाचा लाभ घेता येईल. तसेच ग्राहकांना वस्तूही खरेदी करता येतील.
विशेष म्हणजे प्रवाशांना तिकीट दराच्या काळजीचे कारण नाही. आयआरसीटीसी ग्राहकांसाठी अनोखी योजना घेऊन आली आहे. ग्राहकांना हे तिकीट ईएमआयवर खरेदी घेता येईल. 3, 6, 9, 12, 18 आणि 24 अशा महिन्यांचा पर्याय निवडता येईल. त्या-त्यावेळी तिकीटाची रक्कम ईएमआय स्वरुपात द्यावी लागेल. डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करता येईल.