नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : एकीकडे भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ गेले असून त्याच्या प्रोपल्शन मॉड्यूल पासून लॅंडींग मॉड्यूल उद्या वेगळे होणार आहे. आणि येत्या 23 ऑगस्ट रोजी ते चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे रशियानेही सोडलेले लूना-25 बुधवारी दुपारी 2.27 वाजता चंद्राच्या 100 किमी कक्षेत पोहचले आहे. रशियाचे याने येत्या 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.
चंद्रयान-3 महिनाभराचा प्रवास करीत आता चंद्राच्या अगदी जवळ पोहचले आहे. आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. भारताचे चंद्रयान-3 आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेटमधून उड्डाण केले होते. रशियाने भारताच्या पाठोपाठ 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन लॉंच केले होते. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे त्याच वेळी चंद्राच्या दिशेने निघाले होते. 12 आणि 14 ऑगस्ट रोजी रशियाने लूना-25 ला दोन वेळा थ्रस्टर चालवून दिशा दिली.
रशियाने तब्बल 47 वर्षांनंतर आपले चंद्रावर यान पाठविले आहे. यापूर्वी साल 1976 मध्ये रशियाने लूना-24 मिशन केले होते. लूना-24 यान चंद्राची 170 ग्रॅम माती घेऊन यशस्वीपणे पृथ्वीवर परतले होते. आतापर्यंत चंद्राच्या इक्वेटरवर सर्व मोहिमा झाल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचे यान सॉफ्ट लॅंडींग करणार आहे.
रशियन अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख बोरिसोव यांनी म्हटले की 2027, 2028 आणि 2030 मध्ये लूनाचे तीन आणखी मोहीमा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यानंतर चीन सोबत रशियाची मोहीमा होणार आहेत. तेव्हा चंद्रावर मानवाला पाठविणे आणि लूनार बेस तयार करण्याची रशियाची योजना आहे.
– चंद्राच्या मातीचे नमूने घेऊन चंद्रावर पाण्याचा शोध घेणे
– स्वत:ची नवीन सॉफ्ट लॅंडींग यंत्रणा व स्पेस तंत्राची चाचणी करणे
– दक्षिण ध्रुवाच्या मातीची तपासणी करणे
– सौर्य वादळाचा अभ्यास करण्यासाठी प्लाझ्मा धुळीचा अभ्यास
– डीप स्पेस आणि दूरवरील ग्रहांच्या शोधासाठी चंद्राचा मधले स्टेशन म्हणून वापर