हैदराबाद | 25 ऑगस्ट 2023 : गेल्या अनेक दशकांपासून भारतात दरवर्षी डेंग्यूचा प्रार्दूभाव वाढत असून दरवर्षी देशात तीन लाख लोक त्यामुळे आजारी पडत असतात. आता लवकरच या जीवघेण्या आजारावर प्रतिबंधक लस बाजारात येणार आहे. या लसीसाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरु आहे. आता हैदराबाद येथील इंडीयन इम्युनोलॉजिकल लिमिटेड या लस उत्पादक कंपनीने देशातील पहीली डेंग्यू प्रतिबंधक लस साल 2026 पर्यंत बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
इंडीयन इम्युनोलॉजिकल लिमिटेडचे संचालक के.आनंद कुमार यांनी याबाबत माहीती देताना सांगितले की आमच्या कंपनीच्या लसीच्या अलिकडेच 18 ते 50 वयोगटातील 90 व्यक्तींवर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कोणताही या लसीचा प्रतिकूल परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पहील्या टप्प्यातील ट्रायल संपविल्या आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु होणार आहेत. यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे आम्ही जानेवारी 2026 पर्यंत व्यावसायिक वापरासाठी डेंग्यूची लस बाजारात आणू शकू असे संचालक के.आनंद कुमार यांनी सांगितले.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने इंडीयन इम्युनोलॉजिकल लिमिटेड यासंदर्भात लस उत्पादन करण्यासाठी तांत्रिक सहकार्य केले असल्याचे कुमार यांनी सांगितले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने इंडीयन सह किमान दोन अन्य कंपन्या देखील डेंग्यूवर लस संशोधन करीत आहे. त्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया आणि पॅनासिया बायोटेक अशा दोन कंपन्याचा त्यात समावेश आहे. इंडीयन इम्युनोलॉजिकल लिमिटेड कंपनी हैदराबाद येथील लस निर्मिती कंपनी असून ही कंपनी 50 हून अधिक देशात प्राण्यांची आणि मानवी वापराची लस निर्यात करीत आहे. त्यात 35 टक्क्यांहून अधिक रेबिजच्या लसींचा समावेश आहे. या कंपनीला साल 2023-24 आर्थिक वर्षांत एकूण 13 अब्ज रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.
डेंग्यू या एडीस इजिप्ती मादी डासांच्या चावण्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार असून गेली अनेक दशकांपासून अनेक जण या विषाणूजन्य आजारामुळे रुग्णालयात दाखल होत असून त्यात अनेकांचा मृत्यू देखील होत आहे. जानेवारी ते जुलै 31, 2023 पर्यंत भारतात 31,464 डेंग्यूच्या केस आढळल्या असून 36 जणांचा डेंग्यू संबंधित आजाराने मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आली आहे.