मुंबई : जगभरात भारत हा एकमेव देशच नाती जपणार आहे. या देशात प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्वही आहे. मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोड्या आठवतात. दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. त्याच्या प्रगती अन् दिर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे, असे वचन बहीण भावाकडून घेते.
रक्षाबंधनासंदर्भात एका अख्यायिका सांगितली जाते. राजा बली यांनी कठोर तपस्या करुन यश आणि राज्य मिळवले होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती. राजा बली यांना दानशूर म्हटले जात होते. त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता. परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला. त्यांना स्वर्ग प्राप्तीची महत्वकांक्षा होऊ लागली. यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला. मग ते भगवान विष्णूकडे गेले. इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी वामन अवतारमध्ये ब्राम्ह्यण वेश धारण केला अन् भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहचले. राजा बली यांच्याकडे तीन पाऊल भूमी (जमीन) मागितली. भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला एका पायात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायात स्वर्ग. आता तिसरा पाय कुठे ठेऊ? हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके पुढे केले. भगवंतांनी तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवताच राजा बली पाताळात जाऊन पोहचला.
भगवंत राजा बलीवर प्रसन्न झाले होते. त्यांनी त्यांना वरदान मागण्याचे सांगितले. मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोरच असावे, असे वर मागितले. यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावे लागले. त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाली. त्यांनी नारदकडे सल्ला मागितला. नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला. माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंताना आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आली. तो दिवस होता श्रावण महिन्यातील पोर्णिमा.
भारतीय पंरपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान आहे. तेच विज्ञान रक्षाबंधनमध्ये आहे. राखीतील रेशम हा प्रतीजैविक समजले जाते. राखी बनवण्यात रेशमसह तांदूळ, केसर, दुर्वा, चंदन, मोहरी यांचा वापर केला जातो. या गोष्टी पाचक आहेत. तसेच वात, कफचा नाश करणाऱ्या आहेत. चंदन शीतल आहे. त्यात सेराटोनिन आणि बीटाएडोरफिन हे रसायन असतात. त्यामुळे मेंदू शांत राहतो. भावाचा प्रगतीसाठी या गोष्टी सहायक ठरतात. असे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व असणार रक्षाबंधन हा सण आहे.