कॉमेडियन सुनील ग्रोवर (Sunil Grover) गेल्या काही महिन्यांपासून छोट्या आणि मोठ्या पडद्यापासून दूर आहे. यामागचं कारण म्हणजे त्याच्या हृदयावर चार शस्त्रक्रिया (heart surgery) करण्यात आल्या आहेत. आयसीयूमध्ये (ICU) त्याच्यावर उपचार सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात त्याला मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर चार बायपास सर्जरी करण्यात आले. याचवेळी त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. यातून बरा झाल्यानंतर सुनीलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या कठीण काळाविषयीचा अनुभव आणि त्यातून मिळालेली शिकवण याबद्दल सांगितलं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील म्हणाला, “रोजच्या गडबडीत आपण इतके व्यग्र असतो, की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचे आभार मानण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठीदेखील वेळ नसतो. पण आता मला हे समजलंय की कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे. तहान लागली असताना तुम्ही पाणी पिऊ शकत असाल तर तुम्ही नशिबवान आहात, तुम्ही बेडवर स्वत: उठून बसू शकत असाल तर नशिबवान आहात, कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही बाथरुमपर्यंत चालत जाऊ शकत असाल, तर तुम्ही नशिबवान आहात. आयसीयूमध्ये असताना याच छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागतं, तेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही कोणत्या गोष्टी किती गृहित धरत होता. ही एक गोष्ट समजल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी- प्रसिद्धी, पैसा, करिअर हे बोनस वाटू लागतं. मी प्रत्येकाला हेच सांगू इच्छितो की आपल्या आरोग्याची काळजी घ्या, ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्याबद्दल कृतज्ञ रहा.”
सुनीलने कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाइट्स आणि कपल शर्मा शोमध्ये काम केलं. त्याने अक्षय कुमारच्या ‘गब्बर इज बॅक’ आणि सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.