सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे 500 भाग पूर्ण झाले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. जवळपास साडेतीन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता.
यामागच्या कारणाविषयी बोलताना सचिन मोटे (Sachin Mote) ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “आम्ही गेली साडेतीन-चार वर्षे हा कार्यक्रम करतोय. त्यामुळे आता आम्हालाही थोडं रिफ्रेश होण्याची गरज आहे. आमच्या भूमिकांवर वेगवेगळे प्रयोग झाले. मात्र आता त्यात काहीतरी नवीन घडणं गरजेचं आहे. तोचतोचपणा कमी करण्यासाठी काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा ब्रेक महत्त्वाचा आहे. पण हा ब्रेक मोठा नसेल एवढं नक्की. काही दिवसांनंतर पुन्हा आम्ही शूटिंगला सुरुवात करू.”
“जेव्हापासून हा शो सुरू झाला आहे, तेव्हापासून आम्ही आमच्यातच आहोत. त्यातून जरा बाहेर पडण्याची गरज आहे. झरा मोकळं करणं गरजेचं आहे. सारखं उपसतच राहिलो तर विहिरीला पाणी राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया सचिन गोस्वामी यांनी दिली.
प्रसाद-नम्रता यांची जोडी नेहमीच सरस ठरते, गौरव आणि ओंकार यांचे विनोद प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्यजत्रा पाहून आनंद आणि मनोरंजन मिळाल्याच्या कित्येक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या. रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्रेची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे विनोदवीर आठवड्यातून पाच दिवस यायला सज्ज झाले. मात्र आता काही काळ क्रिएटिव्ह ब्रेकची फार गरज असल्याची प्रतिक्रिया या कलाकारांनी दिली.