‘भाभी जी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते दीपेश भान (Deepesh Bhan) यांचं जुलैमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दीपेश यांच्या पश्चात पत्नी आणि 18 महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर पत्नीला केवळ भावनिक आघातच नाही तर आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला. दीपेश यांच्यावर 50 लाखांचं गृहकर्ज होतं आणि ते कर्ज पत्नीला फेडायचं होतं. अखेर दीपेश यांची सहकलाकार सौम्या टंडनने (Saumya Tandon) त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. सौम्याच्या पुढाकाराने दीपेश यांच्या कुटुंबीयांचं गृहकर्ज पूर्णपणे फेडलं गेलं.
दीपेश यांच्या पत्नीने नुकताच दीपेश यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी चाहते आणि हितचिंतकांना गृहकर्ज फेडल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सौम्या टंडन आणि मालिकेचे निर्माते बेनिफर कोहली यांचेही आभार मानले.
“जेव्हा दीपेश यांचं निधन झालं, तेव्हा माझ्याकडे कर्ज फेडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. कारण मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आणि मला कोणताही आधार नव्हता. त्या काळात सौम्या टंडन माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझ्यासाठी निधी उभारण्यास सुरू केलं. यामुळे महिन्याभरातच आम्ही कर्जाची परतफेड करू शकलो. हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचा माझा उद्देश सौम्याचं सर्वांसमोर आभार मानणे हाच आहे. मी बेनिफर कोहली यांचंही आभार मानू इच्छिते. मालिकेच्या निर्मात्यांनी नेहमीच मला पाठिंबा दिला,” असं त्या म्हणाल्या.
26 जुलै रोजी दीपेश भान आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. तेव्हा क्रिकेट खेळताना ते अचानक जमिनीवर पडले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं.