हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी नंदमुरी तारका रत्न यांचं शनिवारी निधन झालं. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बेंगळुरूतील रुग्णालयात उपचार सुरू होते. एका पदयात्रेदरम्यान त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता तारका रत्न यांना कार्डिॲक अरेस्टचं निदान झालं होतं. अंत्यविधीसाठी त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलं आहे. हैदराबादमधल्या मोकिला परिसरातील त्यांच्या निवासस्थानी तारका रत्न यांचा चुलत भाऊ ज्युनियर एनटीआर, भाऊ नंदमुरी कल्याणराम आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकार पोहोचले आहेत.
अभिनेते शिवाजी राजा, खासदार व्ही. विजयसाई रेड्डी आणि अजय यांनासुद्धा तारका रत्न यांच्या निवासस्थानी पाहिलं गेलं. आणखी एका व्हिडीओमध्ये तारका रत्न यांचा भाऊ नंदमुरी कल्याण रामसोबत ज्युनियर एनटीआरला पाहिलं गेलं. भावाच्या निधनाने तो पूर्णपण खचल्याचं या व्हिडीओत पहायला मिळतंय.
Brother’s @tarak9999 @NANDAMURIKALYAN at #TarakaRatna Anna House. pic.twitter.com/xeza6Jy8tg
— Sai Mohan ‘NTR’ (@Sai_Mohan_999) February 19, 2023
तेलुगू अभिनेते आणि टीडीपी नेते नंदमुरी तारका रत्न यांचं शनिवारी (18 फेब्रुवारी) बेंगळुरूमध्ये निधन झालं. 40 व्या वाढदिवसाच्या चार दिवस आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. येत्या 22 फेब्रुवारी रोजी त्यांचा 40 वा वाढदिवस होता. गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम याठिकाणी पदयात्रेदरम्यान कार्डिॲक अरेस्टमुळे ते बेशुद्ध पडले होतं. त्यानंतर त्यांना बेंगळुरूमधील रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासून ते कोमामध्ये होते.
बेंगळुरूमधील नारायण इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिॲक सायन्सेसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात असताना ज्युनियर एनटीआर, नंदमुरी बालकृष्ण आणि नंदमुरी कल्याण राम यांनी त्यांची भेट घेतली होती. तारका रत्न यांच्या निधनाने सबंध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चिरंजीवी, राम चरण, अल्लू अर्जुन, महेश बाबू, श्री विष्णू यांसह इतरही अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली.
तारका रत्न यांनी 2002 मध्ये ‘ओकट्टू नंबर कुर्राडू’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं होतं. नुकतेच ते डिस्ने प्लस हॉटस्टारवरील 9 अवर्स या तेलुगू वेब सीरिजमध्ये झळकले होते.