मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘इंडियन’, ‘घायल’, ‘अपने’, ‘जीत’, ‘डर’, ‘बॉर्डर’, ‘चूप’, ‘यमला पगला दिवाना’, ‘अर्जुन’, ‘गदर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेते सनी देओल यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची एक भक्कम ओळख तयार केली. पण सध्या सनी देओल ‘गदर 2’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सध्या फक्त भारतातच नाही तर, जगभरात ‘गदर 2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई करताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सध्या फक्त आणि फक्त ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.
‘गदर 2’ फेम अभिनेते सनी देओल यांनी फक्त अभिनय क्षेत्रात काम केलं नाही तर, निर्मिती क्षेत्रात देखील त्यांनी मोठी कामगिरी केली. पण निर्माते म्हणून सनी देओल यांना यश मिळालं नाही. ‘गदर 2’ च्या यशादरम्यान, सनी देओल यांनी निर्माता म्हणून स्वतःला कंगाल घोषित केले आहे. सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
‘गदर 2’ सिनेमाच्या यशाबद्दल आणि निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीबद्दल सनी देओल यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. सिनेमाची निर्मिती केल्यानंतर मी कंगाल होतो असं तारा सिंग म्हणाले. शिवाय एक निर्माता म्हणून येणाऱ्या अडचणींबद्दल देखील सनी देओल यांनी मोठा खुलासा केला…
सनी देओल म्हणाले, ‘मनोरंजन क्षेत्र अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत आहे. सुरुवाताच्या दिवसांमध्ये गोष्टी योग्य प्रकारे हाताळू शकत होतो, कारण डिस्ट्रीब्यूशन सामान्य होतं. पण कॉर्पोरेट यूग आल्यापासून सर्व काही बदललं आहे. एवढा वेळ थांबणं एखाद्याला अवघड असतं. तुम्हाला तुमचा पीआर स्वतःला करावा लागतो.. धावपळ करावी लागते…’
पुढे सनी देओल म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून मला मझ्या सिनेमांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. भूमिका साकरत मी दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्राच्या दिशेने देखील वाटचाल केली. पण मी आता फक्त अभिनेता म्हणून काम करणार आहे…’ असं मोठं वक्तव्य सनी देओल यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सनी देओल अनेक गोष्टींबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘गदर 2’ सिनेमाने आतापर्यंत भारतात जवळपास ४५६ कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.