अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), कियारा अडवाणी तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने गेल्या 19 दिवसांत 159.23 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कार्तिकच्या करिअरमधील यशस्वी चित्रपटांपैकी हा एक असल्याचं म्हटलं जातंय. एकीकडे या चित्रपटाच्या यशानंतर कार्तिकने त्याचं मानधन वाढवल्याची चर्चा असतानाच आता 150 कोटींपैकी कार्तिकला किती नफा (Profit Share) मिळाला, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना खुद्द कार्तिकनेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘150 कोटींच्या कमाईमधून तुला किती प्रॉफिट शेअर मिळणार आहे’, असा प्रश्न एका चाहत्याने त्याला यावेळी विचारला. कार्तिकने मजेशीर अंदाजात या प्रश्नाचं उत्तर दिलं.
‘150 कोटींमधला नफा नाही मिळाला, पण चाहत्यांचं प्रेम मिळालं. या प्रेमापेक्षा कोणताच आकडा मोठा नाही’, असं लिहित त्याने हृदयाचा इमोजी पोस्ट केला. ‘सगळीकडे भुल भुलैय्या 2 ची चर्चा असताना तुला कसं वाटतंय’, असाही एकाने प्रश्न विचारला. त्यावर कार्तिक म्हणाला, ‘मला शहजादा असल्यासारखं वाटतंय.’ विशेष म्हणजे कार्तिकच्या आगामी चित्रपटाचं नावसुद्धा ‘शहजादा’ असं आहे. यावेळी एका चाहत्याने कार्तिकला त्याच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दलही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कार्तिकने लिहिलं, ‘मोस्ट एलिजिबल बॅचलरवरून आधी ‘टेकन’ तरी होऊ द्या, मग लग्नाबद्दल बोलू आपण. एलिजिबल-एलिजिबल म्हणत मी सिंगलच राहीन असं वाटतंय.’
अनीस बाजमी दिग्दर्शित ‘भुल भुलैय्या 2’ हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. कार्तिक लवकरच साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरामुलो’ या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या हिंदी चित्रपटाचं नाव ‘शहजादा’ असं आहे.
पहिला आठवडा- 92.05 कोटी रुपये
दुसरा आठवडा- 49.7 कोटी रुपये
पंधरावा दिवस- 2.81 कोटी रुपये
सोळावा दिवस- 4.55 कोटी रुपये
सतरावा दिवस- 5.71 कोटी रुपये
अठरावा दिवस- 2.25 कोटी रुपये
एकोणिसावा दिवस- 2.16 कोटी रुपये
एकूण कमाई- 159.23 कोटी रुपये