मुंबई : अभिनेता सलमान खानची बहीण आणि आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अर्पिताला बऱ्याचदा बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये पाहिलं जातं. तर कधी कधी तिने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधले मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते आणि विविध फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र अनेकदा अर्पिताला तिच्या दिसण्यावरून ट्रोल करण्यात येतं. कधी तिच्या वजनावरून तर कधी तिच्या सावळ्या रंगावरून नेटकरी तिला ट्रोल करतात. या ट्रोलर्सना तिचा पती आयुष शर्माने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर सध्या आयुषचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्या पत्नीला ट्रोल करणाऱ्यांना फटकारताना दिसत आहे.
आयुषचा हा व्हिडीओ बराच जुना आहे. मात्र सोशल मीडियावर तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. ‘टेडएक्स’ प्लॅटफॉर्मवर तो याविषयी बोलत असतो. तो म्हणतो, “माझी पत्नी अर्पिता ही पब्लिक फिगर असल्याने तिच्यावर अनेकदा निशाणा साधला जातो. जेव्हा कधी ती एखादा फोटो अपलोड करते तेव्हा लोक तिची खिल्ली उडवतात. तिच्या वाढलेल्या वजनावरून टीका केली जाते. लोकांना वाटतं की ती एक सेलिब्रिटी आहे, म्हणून ती जाड असता कामा नये, तिचा रंग सावळा असू नये, तिने सेलिब्रिटींप्रमाणे डिझायनर कपडे परिधान करावेत.”
“अर्पिता जशी आहे, तशी ती स्वत:वर विश्वास ठेवते आणि स्वत:बद्दल तिला गर्व आहे. आजकालच्या काळात आंतरिक सौंदर्याची काही किंमतच नाही. तुम्ही एक व्यक्ती म्हणून किती चांगले आहात, हे कोणालाच जाणून घ्यायचं नाहीये. लोकांना फक्त बाह्य सौंदर्य महत्त्वाचं वाटतं आणि ते तेच बघतात. पण मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. कारण ती तिच्याबाबत खूप स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला ती स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देत नाही. अर्पिता तिच्या अटी-शर्तींवर आयुष्य जगते”, असं तो पुढे म्हणतो.
सलमानचे वडील सलिम खान हे एकदा मॉर्निंग वॉकला जाताना त्यांचं लक्ष रस्त्यावरील एका महिलेकडे गेलं. त्या महिलेसोबत एक छोटी मुलगीसुद्धा होती. सलिम खान यांना त्या महिलेची मदत करायची होती. काही दिवसांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्यासोबत राहणारी लहान मुलगी रस्त्यावर रडत होती. त्यावेळी सलिम यांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ती लहान मुलगी म्हणजेच अर्पिता खान. अर्पिताने 2014 मध्ये आयुष शर्माशी लग्न केलं. या दोघांना अहिल आणि आयात ही दोन मुलं आहेत.