इंफाळ: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांच्या पक्षाला महाराष्ट्रात विधानसभा (maharashtra assembly) निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही. मात्र, मणिपूरमध्ये (manipur) रिपाइंचा एक उमेदवार आघाडीवर आहे. ही आघाडी कायम ठेवून रिपाइंच्या उमेदवाराने बाजी मारली तर रिपाइंचा पाच दशकानंतरचा महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील हा पहिलाच विजय असेल. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे उत्तर प्रदेशात आणि पंजाबमध्ये आमदार होते. अगदी रिपब्लिकन पक्ष उदयाला आल्यानंतरही ही स्थिती होती. मात्र, रिपाइंच्या फाटाफुटीनंतर रिपाइंला महाराष्ट्राबाहेर कधीच यश मिळालं नव्हतं. आता मणिपूरमध्ये उमेदवार जिंकल्यास रिपाइंचं हे महाराष्ट्राबाहेरील पहिलं यश असेल. त्याशिवाय रिपब्लिकन चळवळीला जिंकण्याची उभारी भरण्यासाठीही हा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणारा असेल. त्यामुळे मणिपूरमधील या जागेकडे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचं लागलं आहे.
किशमथोंग विधानसभा मतदारसंघातून रिपाइंचे उमेदवार महेश्वर थौनॉजम निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदारसंघात 403 मतांनी आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार सपम निशिकांत सिंग यांना त्यांनी पिछाडीवर टाकलं आहे. त्यामुळे या मतदार संघात रिपाइंचे महेश्वर विजयी होतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पाच राज्यांपैकी काही राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार दिले होते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय सोडा, साधी आघाडीही घेता आलेली नाही. उलट या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. तर, रिपाइंने मात्र मणिपूरमध्ये आघाडी घेऊन आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये भाजपसोबत युती करण्याची आठवलेंची इच्छा होती. रिपाइं युतीला भाजपने दोन जागा द्याव्यात अशी मागणी आठवले यांनी केली होती. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चाही केली होती. मात्र, ही युती होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी मणिपूरमधून 20 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आठवले यांनी मणिपूरमध्ये अनेक रॅली आणि रोड शो केला होता.
संबंधित बातम्या: