मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवलय. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव झालाय. कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. पण प्रत्यक्ष मतदारांनी कौल मात्र वेगळा दिलाय. सत्ताधारी भाजपाचा या राज्यात दारुण पराभव झालाय. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे भाजपा विरोधात असलेल्या पक्षांनाही बळ मिळालय.
खासकरुन महाराष्ट्रात काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचे पडसाद उमटलेला पहायला मिळू शकतात. महाविकास आघाडी अधिक बळकट होईल, अशी शक्यता आहे.
शरद पवारांकडून महत्वाचे संकेत
मागच्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच चित्र निर्माण झालं होतं. महाविकास आघाडी फुटेल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. पण कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडी अधिक भक्कम होऊ शकते. यांचे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
पवारांनी कोणाशी चर्चा केली?
दुपारपर्यंत कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. त्याशिवाय पवारांनी काँग्रेस नेत्यांसोबत सुद्धा फोनवरुन संवाद साधला. लवकरच महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
मतभेद वाढत होते
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आहे. अलीकडे या तिन्ही पक्षात मतभेद वाढत असल्याच चित्र निर्माण झालं होतं. पण कर्नाटक निवडणूक निकालानंतर चित्र बदलू शकतं. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्याआधी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे मागच्यावर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळलं.