बंगळुरु : मागच्या आठवड्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. कर्नाटकातील जनतेने भाजपाला सत्तेवरुन खाली खेचत काँग्रेसला कौल दिलाय. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. पण काँग्रेसला अजून मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवता आलेला नाहीय. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. सिद्धरमय्या हे कर्नाटकातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद संभाळण्याचा अनुभव आहे.
त्याचवेळी डीके शिवकुमार यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिलं जातं. पक्ष अडचणीत असताना नेहमीच ते संकटमोचक बनून पक्षासाठी उभे राहिले आहेत. आता ते प्रदेशाध्यक्ष असतानाच काँग्रेसने मोठं बहुमत मिळवलय.
‘फक्त एक नंबर आहे 135’
कर्नाटकात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरण्याआधी डीके शिवकुमार यांनी काही महत्वाची विधान केली आहेत. आमदाराच्या पाठिंब्याचा आकाड सिद्धरमय्या यांच्याकडे आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील? या प्रश्नावर शिवकुमार सरळ म्हणाले, “कोणी सांगितलं आकडे त्यांच्याकडे आहेत?. कुठलेही नंबर नाहीयत. फक्त एक नंबर आहे 135” ही काँग्रेस आमदारांची संख्या आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
‘त्यावेळी तिथे काय ती चर्चा’
सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? या प्रश्नावर शिवकुमार म्हणाले की, अजूनपर्यंत काही ठरलेलं नाहीय. मी मंगळवारी नवी दिल्लीला जाईन त्यावेळी तिथे काय ती चर्चा होईल.
तुम्ही पद वाटून घ्याल का?
सिद्धरमय्या यांच्यासोबत तुम्ही पद वाटून घ्याल का? या प्रश्नावर डीके शिवकुमार म्हणाले की, भावंडांमध्ये वाटतात, तशी ही काही वडिलोपार्जित संपत्ती नाही. सरकार स्थापनेचा प्रश्न आहे. यात काही वाटप होऊ शकत नाही.
तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?
सिद्धरमय्या मुख्यमंत्री झाले, तर तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? या प्रश्नावर शिवकुमार सरळ म्हणाले, “अजून काही चर्चा झालेली नाही किंवा अंतिम काही ठरलेलं सुद्धा नाही. माझ्या काही मागण्या नाहीत”