TV9 Tips : कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी चांगले हस्ताक्षर (handwriting) काढणे खूप महत्वाचे असते. अनेक वेळा उत्तर बरोबर लिहूनही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी मार्क मिळत नाहीत. त्याचं कारण म्हणजे हस्ताक्षर, त्यासाठी काही गुण कापले जाऊ शकतात. परीक्षेत अक्षर चांगलं, सुवाच्य काढलं नसेल तर उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना उत्तरे नीट समजण्यास अडचण येऊ शकते. यामुळेच प्रश्नांची उत्तर बरोबर लिहूनही जेवढे पाहिजेत तेवढे गुण (marks) मिळवण्यास विद्यार्थी अपयशी ठरतात.
विद्यार्थी अनेक गोष्टींच्या मदतीने आपले हस्ताक्षर सुधारून परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतात. चांगले हस्ताक्षर यावे यासाठी काही टिप्सचे पालन करणेही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
नियमितपणे करा अभ्यास
हस्ताक्षर सुधारायचे असेल तर कोणत्याही कौशल्याप्रमाणेच सातत्याने लिखाणाचा सराव केला पाहिजे. स्वच्छ, व्यवस्थित, नियंत्रित पद्धतीने लिहीण्यासाठी दररोज काही वेळ लिहीण्याचा सराव करावा. जेवढा जास्त सराव कराल तेवढेच तुमचे अक्षर सुधारेल व चांगले येईल.
योग्य साधनांचा करा उपयोग
चांगलं अक्षर यायला हवं असेल तर त्यासाठी योग्य साधनांचा वापर करणेही तेवढेच महत्वाचे आहे. ही साधने आपल्या हस्ताक्षरावर परिणाम करू शकतात. त्यासाठी हातात चांगलं, सोयीस्कर, सहज हाताळता येईल अशी पेन्सिल किंवा पेन पकडून त्याचा वापर करावा.
हस्ताक्षराची समीक्षा करा
दररोज काही वेळ लेखन केल्यानंतर ते हस्ताक्षर कसे आले आहे ते तपासा, त्याची समीक्षा करा. अक्षर चांगलं आलं नाही तर पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा. ते सुधारण्यासाठी अधिक मेहनत करा.
या गोष्टी नक्की कराव्यात
हस्ताक्षर सुधारायचे असेल तर तुम्हाला जो विषय आवडतो, ज्यात रस आहे तो निवडा, त्यासंबधी वाचन करा आणि ते कागदावर लिहून काढा. एखादं पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचूनही तुम्ही मजकूर लिहून हस्ताक्षर सुधारायचा प्रयत्न करू शकता. लिखाणाचा सराव करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लिहीताना आरामात, स्पष्ट, सुवाच्य लिहावे. आणि अक्षर थोडं स्पष्ट, मोठं काढण्याचा प्रयत्न करावा. नियमित सरावाने तुमचं अक्षर नक्की सुधारेल फक्त त्यात सातत्य हवं.