इचलकरंजी : जुन्या वादातून एका पानपट्टी चालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री इचलकरंजी येथील विठ्ठल नगर येथे घडली आहे. रेहमान मलिक नदाफ असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय पानपट्टी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसात हत्येची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यश गावडे, आतिफ चिकोडे आणि साहिल माच्छरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
रेहमान याने दोन महिन्यांपूर्वीच पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला होता. यश गावडे आणि त्याच्या एका मित्राचा वाद झाला होता. तो वाद सोडवण्यासाठी रेहमानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर रेहमान आणि यश यांचा वाद झाला होता.
याच कारणातून तिघा संशयितांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास रेहमान याला घराशेजारी बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर वार केले. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले होते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रेहमानला इचलकरंजी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैजने, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शहापूर सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी कसून शोध घेत केवळ आठ तासात आरोपींना गजाआड केले. अधिक तपास शहापूर पोलीस करीत आहेत.