कानपूर : मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात घडली आहे. भानु शुक्ला असे मृत्यू झालेल्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. भानु बँकेत नोकरी करत होता. शनिवारी सुट्टी असल्याने भानु मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. यावेळी ही धक्कादायक घटना घडली. भानुच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. भानुच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कानपूरमधील किदवई नगर येथे भानु शुक्ला हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. भानु बँकेत नोकरी करत होता. पाच वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुलंही आहेत.
शनिवारी सुट्टी असल्याने भानु आपल्या मित्रांसोबत देवनगर येथील राजकीय ग्राऊंडवर क्रिकेटची मॅच खेळायला गेला होता. या दरम्यान बॉलिंग करताना अचानक भानु खाली कोसळला.
भानुला तात्काळ मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्डियाक अटॅकमुळे भानुचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भानुच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याआधी क्रिकेट खेळताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कानपूरमधील बिल्हौरमध्ये घडली होती. सामन्यादरम्यान बॅटिंग करत असलेल्या मुलगा रन काढण्यासाठी धावला आणि खाली कोसळला. मुलाला तात्काळ रुग्णालयता नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कानपूरमध्ये 1 ते 9 जानेवारी 2023 दरम्यान एकाच सरकारी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने 130 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या थंडीने देशभरात कहर केला असून, थंडीमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन रक्तदाब अचानक वाढतो. यामुळे हा ऋतू हृदयविकाराच्या रुग्णांसाठी घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.