Dombviali Crime : वाढत्या घरफोड्यांनी डोंबिवलीकर हैराण, बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास

| Updated on: Aug 22, 2023 | 6:24 PM

डोंबिवलीत घरफोड्या वाढत आहेत. विशेषतः एकट्या राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Dombviali Crime : वाढत्या घरफोड्यांनी डोंबिवलीकर हैराण, बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास
डोंबिवलीत चोऱ्यांचे सत्र वाढले
Follow us on

डोंबिवली / 22 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत चोऱ्या, घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बंद घरांना टार्गेट करुन चोरटे घरफोड्या करत लूट करतात. वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एमआयडीसीच्या निवासी विभागात ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या घरे आणि बंगल्यांना चोरटे सर्वाधिक लक्ष्य करत आहेत. वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी काही ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवसाढवळ्याही चोरटे चोऱ्या करण्याची हिंमत करत आहेत. नुकत्याच डोंबिवलीत दोन ठिकाणी घरफोड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रामनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

राजाजी पथ येथे घडली पहिली घटना

पहिली घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत घडली. राजाजी पथावर असलेल्या राधाकृष्ण सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक सुधीर वेंगुर्लेकर यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. वेंगुर्लेकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी वेंगुर्लेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुसरी घटना पेंडसेनगरमध्ये उघडकीस

दुसरी घटना पेंडसे नगरमध्ये घडली आहे. आनंददीप बिल्डिंग क्र.4 मध्ये राहणारे संकेत जयंत कुलकर्णी (34) यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या घरातील एकूण 4 लाख 74 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी कुलकर्णी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसी भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या वाढल्याने रहिवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या चाळी चोरट्यांचे आश्रयस्थान बनल्या असल्याचे सांगण्यात येते.

हे सुद्धा वाचा