पुणे / 17 ऑगस्ट 2023 : पोलीस असल्याची बतावणी करत महामार्गावर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. जाफर हुसेन इराणी असं आरोपीचं नाव आहे. आरोपीवर याआधी 30 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी चार गुन्ह्यांची आरोपीकडून उकल झाली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. कोंढवा परिसरातून सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
सदर टोळी पुणे-सातारा महामार्गावर विविध ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांची फसवणूक करायची. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा करायची. भोर विभागात असे गुन्हे वाढले होते. यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करून दोन अधिकाऱ्यांसह एक पथक नेमले होते.
गुन्ह्यांचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आजुबाजूचे साक्षीदार यांच्याकडे तपास केला. तपासादरम्यान भोर विभागात पोलीस बतावणी करून गुन्हा करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. टोळीचा म्होरक्या जाफर हुसेन इराणी हा त्याचा कर्नाटक राज्यातील साथीदारासह गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या बातमीचे आधारे तपास पथकाने जाफर इराणी याला कोंढवा परीसरातून सापळा लावून ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, भोर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. शिवाजी ननवरे, प्रदीप चौधरी, पो.ह.वा. राजू मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, पो.ना. अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पो.कॉ. धिरज जाधव, मंगेश भगत यांनी केली.