मुंबई : आपसातील वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गेली सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. पण एका लॉटरीमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून कांदिवलीतून अटक केली आहे. अजय कुराडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करुन पोलिसांनी पुन्हा त्याची कोठडीत रवानगी केली आहे. याबाबत पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
आरोपी 2015 मध्ये झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. काही कारणातून आरोपीसह अन्य दोघांनी मिळून दिपक कदम नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. मयतासोबत वाद झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला बांबूने मारहाण केली होती. या मारहाणीत कदम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना अटक करत पोलिसांनी तुरुंगात धाडले होते. मात्र काही दिवसांनी मुख्य आरोपी जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. गेली सात वर्षे नाव बदलून तो विरारमध्ये राहत होता. मात्र कांदिवलीतील घराच्या एसआरएच्या लॉटरीसाठी आरोपी कांदिवलीत आला. तो कांदिवलीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या.