मुंबई : रायगडमध्ये हरिहरेश्वर येथील बोटीवर शस्त्र सापडल्यानंतर राज्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी, महत्वाची शहरे आणि सागरी महामार्गावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. मुंबईमध्ये सुरक्षा (Security) वाढवण्यात आली आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पोलिसांकडून नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. पोलीस गाडीत बसलेल्या लोकांची चौकशी करत आहेत, त्यानंतरच त्यांना येथून पुढे जाण्यासाठी सोडण्यात येत आहे. रायगडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सतर्कतेच्या सूचना दिल्या.
रायगडमधील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळच्या सुमारास एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. बोटीची तपासणी केली असता आत एक के 47 बंदुका आढळल्या. पोलिसांकडून याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. शस्त्रांसह बोट बोट आढळल्यानंतर रायगड जिल्ह्यात पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
हरिहरेश्वर समुद्रकिनारी शस्त्रास्त्र सापडल्याने राज्यात सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगांव चौपाटीसह इतर सर्वत्र पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. प्रत्येक वाहनांची चौकशी केली जात आहे. हरिहरेश्वर या ठिकाणी शस्त्र सापडल्याने, तसेच मुंबईत अधिवेशन सुरू आहे, पुढे सण उत्सव आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईत नाकाबंदी वाढवली आहे.
रायगड, मुंबईसह पुण्यात देखील हाय अलर्ट देण्यात आलाय. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. याच पार्श्वभूमीवर शहरात प्रमुख चौकात नाकाबंदीही लावण्यात आली आहे.
हरिहरेश्वमध्ये संशयास्पद बोट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आहेत. सागरी महामार्गावरील गस्तही वाढवण्यात आली आहे. 20 हून अधिक सागरी महामार्गावरील चेक पोस्ट अलर्टवर आहेत. सागरी किनाऱ्यावरील लँडिंग पॉईंट वर 24 तास पोलिसांची नजर असणार आहे. सागरी महामार्गावरील गाड्यांची कसून चौकशी सुरू आहे. (Red alert across state after suspicious boat found on Harihareshwar beach)