मुंबई / 22 ऑगस्ट 2023 : मुंबईत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे. जोगेश्वरी येथील 13 वर्षाची मुलगी रिक्षाने खाजगी क्लासहून घरी परतत होती. यावेळा रिक्षाचालकाने तिला चुकीचा स्पर्श करण्यास सुरवात केली. मुलगी कशीबशी घरी पोहचली आणि घडला प्रकार आईला सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी पवई पोलीस ठाणे गाठत रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिली. मुलीच्या जबाबावरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मुलींवरील वाढत्या घटना पाहता अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
पीडित मुलगी शनिवारी पवईला खाजगी क्लासेसला गेली होती. तेथून घरी परतण्यासाठी तिने पवईहून रिक्षा पकडली. रिक्षा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर येताच 55 वर्षीय रिक्षाचालकाने एकटी असल्याचा फायदा घेत तिला घाणेरडा स्पर्श करण्यास सुरवात केली. मुलगी कशीबशी सुटका करुन घरी परतली. यानंतर तिने सर्व घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला.
आई-वडिलांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पवई पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा शोध घेतला. रिक्षाच्या नंबरवरुन मालकाचा शोध घेतला.
तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने आरोपीला घाटकोपर येथील एलबीएस रोड येथून अटक करण्यात आली. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या संबंधित कलमांनुसार, 354 (लैंगिक छळ) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.