मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्यावर अखेर मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी ईडीने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचाही जबाब नोंदवला आहे. सचिन सावंत आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या पैशांच्या व्यवहारातून तिची चौकशी करण्यात आली. ईडीने संबंधित व्यवहाराच्या प्रकरणात अभिनेत्रीला समन्स जारी करुन बोलावले होते. सचिन सावंत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली आहे. सचिन सावंत लखनौ जीएसटी विभागात कार्यरत होते. याआधी सावंत ईडीमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत होते. सचिन सावंत यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल दाखल केला होता. त्या प्रकरणी मनी लॉड्रिंगच्या अनुषंगाने ईडी तपास करत होती.
आयआरएस अधिकारी सचिन सावंत हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सुमारे 500 कोटींच्या अफरातफर प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप ठेवत सचिन सावंत यांना जून महिन्यात अटक करण्यात आली आहे. यानंतर सावंत बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचेही उघडकीस आले. यानंतर ईडी आणि सीबीआय दोन्ही संस्थांनी सावंत यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला. सीबीआयने सचिन सावंत यांच्या आई-वडिल आणि पत्नीलाही आरोपी केले आहे.
सचिन सावंत यांचे वडील बाळासाहेब सावंत हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या नावे दाद येथे सेव्हन हिल कन्ट्रोवेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय दादर येथे आढळले. तसेच सानपाडा येथील फ्लॅट खरेदी करण्यासाठी सावंत यांनी एक कोटी 2 लाख रुपये रोकड दिली होती. ही रोकडही बेकायदेशीर असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच सावंत यांच्या 44 लाखांची बीएमडब्लू कार आढळली.