मुंबई : नंदुरबारमध्ये (Nandurbar Crime News) ज्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह तब्बल 44 दिवस मिठाच्या खड्ड्यात ठेवला होता, त्या मुलीच्या मृतदेहाची दुसरी ऑटोप्सी करण्यात आली. मुंबईच्या जेजे रुग्णालमध्ये (JJ Hospital, Mumbai) शुक्रवारी या 21 वर्षीय मृत तरुणीची ऑटोप्सी (Autopsy) झाली. या ऑटोप्सीच्या सविस्तर रिपोर्टरची आता प्रतीक्षा आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार खळबळजनक माहिती या ऑटोप्सी रिपोर्टमधून समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय.
पीडित मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह तब्बल 44 दिवसांसाठी मिठाच्या खड्ड्यामध्ये पुरला होता. नुकतीच ही बाब उघडकीस आली होती. त्यानंतर या मुलीच्या मृतदेहाची दुसऱ्यांदा ऑटोप्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी दुपारी या तरुणीचा मृतदेह मुंबईच्या भायखळा येथील जेजे रुग्णालयामध्ये आणण्यात आला. शुक्रवारी पहाटे 2.30 वाजता या तरुणीची दुसरी ऑटोप्सी करण्यात आली असल्याची माहिती समोर आलीय.
ऑटोप्सी रिपोर्टमध्ये या मुलीच्या मानेवर एक गंभीर अशी संशयास्पद खूण आढळून आलीय. तसंच या मुलीचा डावा हात व्यवस्थित असला, तर तिचा उजवा हात हा अकार्यक्षम होता, असंही समोर आलंय. मुंबईत करण्यात आलेल्या ऑटोप्सीआधी या तरुणीची नंदुरबारमध्येही ऑटोप्सी करण्यात आली होती.
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील वावी इथं 1 ऑगस्ट रोजी पीडित 21 वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळून आली होती. एके ठिकाणी ही तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली होती. या तरुणीच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा गंभीर आरोप केला होता. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोवर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यास या मुलीच्या वडिलांनी नकार दिला होता.
नंदुरबारमध्येही या पीडितेची ऑटोप्सी करण्यात आली होती. त्यात या मुलीने आत्महत्या केली असल्याचा रिपोर्ट देण्यात आला होता. दरम्यान, या मुलीचा एक हात अकार्यक्षम असल्यानं ती स्वतःला गळफास लावून लटकवून घेणं संशयास्पद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या मुलीच्या मृत्यूवरुन शंका घेतली जातेय.
दरम्यान, पीडितेवर बलात्कार किंवा लैंगिक छळही या झाला होता का?, हे शोधण्यात अद्याप यश आलेलं नाही. कारण या मुलीच्या मृतदेहाचा भाग काही प्रमाणात कुजला गेला आहे. त्यामुळे ऑटोप्सी करतानाही तज्ज्ञांना शर्थ करावी लागली. मात्र आता या मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधून काढणं, हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. शुक्रवारी झालेल्या ऑटोप्सीनंतर या मुलीचा मृतदेह पुन्हा तिच्या कुटुंबियांच्या हवाले करण्यात आला.
पोलिसांनी माझ्या मुलीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास योग्यप्रकारे केला नाही, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केलाय. तर पोलीस अधिकारी मिलिंद भारांबे यांनी दुसऱ्या ऑटोप्सी रिपोर्टमधून समोर आलेल्या बाबींनी या प्रकरणाचं गूढ वाढवलं असल्याचं म्हटलंय. आतापर्यंत पोलिसांनी तिघांना याप्रकरणी अटकही केल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्या ऑटोप्सीनंतर या मुलीचा उजवा हात अकार्यक्षम होता, याची माहिती पोलिसांनी दिली गेली नव्हती, असंही त्यांनी म्हटलंय.