मुंबई : संशयाच भूत मानगुटीवर बसलं की, सुखी संसार उद्धवस्त व्हायला वेळ लागत नाही. अशाच एका प्रकरणात मनातील संशयापोटी नवऱ्याने बायकोवर प्राणघातक हल्ला केला. आरोपी नवऱ्याने बायकोच्या मानेत कैची खुपसली. 26 एप्रिलला रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. नवरा कामावरुन घरी परतला होता. बायको मोबाइल फोनवर चॅटिंगमध्ये व्यस्त होती. समोर 3 वर्षाच मूल रडत होतं.
हल्ला केल्यानंतर आरोपी सुरेश विश्वाकर्मा शेजाऱ्याच्या मदतीने बायकोला रुग्णालयात घेऊन गेला. तिथे जाऊन त्याने बायकोच्या प्रियकराने तिच्यावर हल्ला केला, असा बनाव रचला. पण अखेर पोलीस चौकशीत त्याने सत्य काय ते सांगितलं. मिड डे ने हे वृत्त दिलं आहे.
शेजाऱ्यांनी काय सांगितलेलं?
गोपाळ मिस्त्री चाळ एकेजी नगर येथे ही घटना घडली. सुरेश पेशाने सुतारकाम करतो. तो रात्री उशिरा घरी यायचा. सुरेशला त्याच्या शेजाऱ्यांनी अनेकदा सांगितलं होतं, तू जेव्हा घराबाहेर जातोस, तेव्हा तुझा मित्र बायकोला भेटण्यासाठी म्हणून तुझ्या घरी येतो.
सुरेशने घरी आल्यावर काय पाहिलं?
हे समजल्यानंतर सुरेशने त्याच्या बायकोला समजावल. बुधवारी रात्री 10.30 ते 11.30 च्या दरम्यान सुरेश घरी आला. त्यावेळी त्याने पाहिलं, मूल खूप रडत होतं. बायको मोबाइल फोनवर चॅटिंगमध्ये व्यस्त होती. त्याने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. बायकोच सुरशेच्या मित्रा बरोबरच चॅटिग चाललेलं. नवरा-बायकोमध्ये यावरुन जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात सुरेशने कैची उचलली व बायकोच्या मानेत खुपसली.
शेजाऱ्यांना जाऊन काय सांगितलं?
“बायको जखमी होऊन कोसळताच सुरेश बाहेर गेला व त्याने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावल. माझा मित्र बायकोवर हल्ला करुन पळून गेला”असं त्याने सांगितलं. “जखमी महिलेला सायन हॉस्पिटल येथे नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं” असं पोलिसांनी सांगितलं.
हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी लगेच शाहू नगर पोलिसांना या बद्दल माहिती कळवली. त्यांनी विश्वाकर्माची चौकशी सुरु केली.
त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय
“पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर सुरेश विश्वाकर्माच्या उत्तरात विसंगती दिसून आली. त्यांच्या कॉमन मित्राला सुद्धा चौकशीसाठी बोलावलं. त्याचे सुरेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. चौकशीअखेर सुरेशने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत अटक करण्यात आलीय” वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी ही माहिती दिली.