इचलकरंजी : इचलकरंजी (Ichalkaranji News) शहरातील शाहू पुतळा जवळ ट्रक व स्कूल बस चा अपघात होऊन बसमधील 50 पैकी सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. इचलकरंजी (Ichalkaranji Accident News) शहरात असणाऱ्या डी के टी ई सोसायटी येथील कलावंत मळा येथे इचलकरंजी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज मधील पाचवी ते दहावीत शिकणारे विद्यार्थी आज शाळा सुटल्यानंतर स्कूल बस (School Bus) मधून घरी निघाले होते. इचलकरंजी ते रुई गावातील सर्व विद्यार्थी स्कूल बस घेऊन जाते. ही स्कूल बस शाहू पुतळा मार्गे रुकडी येथे जात होती. तर ट्रक शाहू पुतळा मार्गे छत्रपती शिवतीर्थ येथे जात होता. शाहू महाराज पुतळा चौक येथे ट्रक व स्कूलबस समोरा समोर आले असता ट्रकची स्कूलला बसला धडक बसली. त्यावेळी स्कूल बस मध्ये पन्नास विद्यार्थी होते. अचानक धडक लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बस मधील सुमारे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बाकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.
स्कूल बसला ट्रक जोरात धडकल्यामुळे स्कूल बसचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच नागरिकांनी स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना स्कूल बस मधून बाहेर काढले व त्यांना धीर दिला. या अपघाताची माहिती पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाजीनगर पोलीसांची फोन लॅन्डलाईन बंद असल्यामुळे कोणाला फोन करायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर काही वेळ उपस्थित झाला होता.
दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी येऊन दोन्ही वाहने ताब्यात घेत पुढील तपास केला. शिवाजीनगर पोलिस या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपूर्वी जनता बँक चौकामध्ये असाच अपघात एसटी आणि स्कूल बस चा झाला होता. यामध्ये सुमारे पाच मुले जखमी झाली होती. आता पुन्हा स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ट्रक चालक व स्कूल बस वरील ड्रायव्हर यांना गडबडीत आणि निष्काळजीपणे जाण्याच्या प्रकारामुळे हे वाढते अपघात विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. अशा बेजबाबदार ट्रकचालक व स्कूलबस चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे.