बोगस टीसी बनून प्रवाशांना लुटणं असं महाग पडलं, अखेर बोगस टीसीची अशी वाट लागली

| Updated on: Aug 28, 2023 | 6:53 PM

दिवा ते डोंबिवली दरम्यान बोगस टीसी दंड वसुली करीत असल्याच्या प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला आधी दिवा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बोगस टीसी बनून प्रवाशांना लुटणं असं महाग पडलं, अखेर बोगस टीसीची अशी वाट लागली
first class
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेच्या दिवा ते डोंबिवली दरम्यान फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या एका अत्यंत तरूण टीसीला प्रवाशांनी त्याचे ओळखपत्र दाखव असे सांगताच तो गोंधळल्याने प्रवाशांनी त्याला स्टेशन मास्तरांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात हा टीसी बोगस असल्याचे उघडकीस आल्याने त्याला अटक करण्यात आले आहे. या बोगस टीसीने नेमके किती जणांकडून दंड वसुल केला आहे, आणि किती दिवसांपासून तो अशाप्रकारे प्रवाशांकडून अवैध प्रकारे दंड वसुली करीत होता याचा तपास सुरु आहे.

रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात या बोगस टीसीचे नाव हरीओम विजय बहादूर सिंह ( 21 ) असे असून त्याने टीसीच्या खऱ्या ओळखपत्रात स्वत:चे नाव आणि फोटो जोडत हुबेहुब ओळखपत्र तयार केल्याचे उघडकीस आले आहे. हरिओम सिंह हा सध्या ऐरोली परिसरात रहात असून तो मुळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याच्या टीसीच्या ओळखपत्रावर उत्तर रेल्वे असा उल्लेख असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

बोगस ओळखपत्र सापडले

दिवा ते डोंबिवली दरम्यान बोगस टीसी दंड वसुली करीत असल्याच्या प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला आधी दिवा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुख्य तिकीट निरीक्षक प्रमोद सरगैया यांनी या नावाचा कोणताही टीसी मध्य रेल्वेवर नसल्याचे कळविल्यानंतर या टीसीचे ओळखपत्र तपासण्यात आले असता ते बोगस निघाले. आधी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला नंतर गुन्हा कोपर आणि डोंबिवली दरम्यान घडल्याने त्याला पुन्हा डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस कोठडीत रवानगी

रेल्वे न्यायालयात आरोपी सिंह याला हजर करण्यात येऊन त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक अर्चना दुसाणे करीत आहेत. या प्रकरणात आरोपी टीसीने किती प्रवाशांना अशा प्रकारे लुबाडले असल्याचा तपास सुरु आहे.