मुंबई : भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसाद लाड यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणांमध्ये गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी अनिल गायकवाडचा फोटो समोर आलाय. आरोपी अनिल गायकवाड हा रामदास आठवले यांचा कार्यकर्ता असल्याचं प्रसाद लाड यांनी दिलेल्या जोड पत्रात नमूद केलं आहे, पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपींनी प्रसाद लाड यांच्या कार्यालयाची, घराची रेकी केली असल्याची सुत्रांची माहिती आहे.
प्रसाद लाड धमकी प्रकरणाचं दगडी चाळ कनेक्शन की छोटा राजन कनेक्शन ? याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 टीम रवाना झाल्या आहेत.
स्वत: मुख्यमंत्र्यांकडून दखल
कामगार युनियनच्या वादातून प्रसाद लाड यांना ही धमकी देण्यात आली आहे का? या दिशेनेही तपासाला सुरुवात झालीय. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद लाड यांच्या धमकी प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे वेगाने सूत्र हलली
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आदेश दिले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे वेगाने सूत्र हलली आहेत. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण दिलय. प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेतही वाढ केली जाऊ शकते.