योगेश बोरसे, पुणे | 21 ऑगस्ट 2023 : देशाचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता झाली. अमृत महोत्सवी वर्षामुळे राज्य सरकारने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्यातही 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या भरती प्रक्रियेसंदर्भात पोलीस भरती, तलाठी भरती अन् जिल्हा परिषद भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आता आणखी एक विभागात शंभर टक्के पदे भरण्यात येणार आहे.
राज्यातील विविध विभागात शासकीय कर्मचाऱ्यांची भरती अनेक वर्षांपासून रखडली होती. यामुळे राज्यातील रिक्त पदांची संख्या सुमारे 2 लाख 44 हजार 405 वर गेली आहे. राज्यातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत तब्बल 23 टक्के पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने विविध विभागांत 75 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला. पोलीस, जिल्हा परिषद, तलाठीनंतर आता आरोग्य विभागाचा क्रमांक आला आहे. राज्यात लवकरच आरोग्य विभागात 14 हजार जागांची भरती होणार आहे. राज्यातील 75 हजार जागा भरतीसंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जानेवारी महिन्यात काढले होते.
आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया खासगी कंपनीकडे देण्यात येणार आहे. टीसीएस कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. आरोग्य विभागातील सगळ्या आस्थापनेवरील 100 टक्के पदे भरण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत भरती प्रक्रीया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला दिला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेत 19,460 हजार जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. पोलीस भरतीसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांची लेखी आणि शारीरिक चाचणी झाली आहे. तलाठी भरतीचे पेपर सध्या राज्यात सुरु आहेत. यावेळी सर्व्हेर डाऊनच्या अडचणी येत आहेत. यामुळे २१ ऑगस्ट रोजी पेपरची वेळ बदलण्याची नामुष्की परीक्षेचे आयोजन करणाऱ्यांवर आली. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप होत होता.