नवी दिल्ली : पेट्रोलियम उत्पादन आणि विक्री करणाऱ्या देशांची जागतिक संघटना ओपेक प्लसने (OPEC +) एक मोठी खेळी खेळली आहे. तर अमेरिकेसह युरोपचा रशियाने (Russia) गेम केला आहे. ओपेक आणि रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटवले आहे. त्यामुळे जगात महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन थंडीत युरोपला मोठा फटका बसू शकतो. तर भारत आणि अन्य विकसनशील देशात महागाई (Inflation) भडकू शकते. गरीब राष्ट्रांबाबत तर विचारच करायला नको. भारतीय केंद्रीय बँक आणि केंद्र सरकारला महागाई आटोक्यात आणण्यासाठी कठोर धोरण राबवावे लागतील.
अशी होईल कपात
ओपेक आणि रशियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात कपात केली आहे. मंगळवारी याविषयीच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल. सौदी अरबने प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला. इराकने प्रति दिवस 211,000 बॅरल, संयुक्त अरब अमिरातने 144,000 बॅरल प्रति दिवस, कुवेतने 128,000 बॅरल प्रत्येक दिवशी, अल्गेरिया 48 हजार बॅरल तर ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली. आज हा भाव 85 डॉलरच्या घरात आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत धोरण
या धोरणाचा जगातील अनेक देशांवर विपरीत परिणाम दिसून येतील. महागाई भडकेल. जनतेला मोठा त्रास होईल. ओपेक प्लसच्या दाव्यानुसार, नोव्हेंबर 2023 पर्यंत ही कपात लागू ठेवण्यात येणार आहे. ही कपात करण्यामागची खेळी अजून स्पष्ट झाली नाही. पण रशियाच्या वरचष्म्यामुळे युरोपची दमकोंडी करण्यासाठी हे पाऊल टाकल्याची जोरदार चर्चा आहे.
अचानक घेतला निर्णय
जगाला ओपेकचा हा निर्णय अनेपक्षित होता. कारण यापूर्वीच्या ओपेक देशांच्या बैठकीत कच्चा तेलाच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारची कपातीची शिफारस वा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नव्हता. पण अचानकच या संघटनेने हा निर्णय घेऊन जगाची चिंता वाढवली आहे. अर्थात यामागे भूराजकीय कारण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या वर्षात, एप्रिल 2023 साठी 2 दशलक्षापर्यंत कपातीची संभावना होतीच.
बाजाराने काय दिली प्रतिक्रिया
ओपेक आणि रशियाच्या उत्पादन कपीताच्या निर्णयाला बाजाराने तात्काळ प्रतिक्रिया दिला. 3 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत 7 टक्के वाढ होऊन ते 85 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसह युरोपमधील महागाई, या देशातील बँकिंग सेक्टरमध्ये घोंगावत असलेले संकट, याचा शेअर बाजारासह इतर घटकांवर परिणाम झाला आहे. त्यातच चीनमध्ये झिरो कोविड धोरणाला साईड लाईन केल्यापासून चीनमध्ये नागरीक आता मुक्तपणे फिरत आहे. चीनमध्ये इंधनाची मागणी वाढली आहे. आता पुरवठा कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहचण्याची भीती आहे.
भारतावर काय होईल परिणाम
भारत कच्चा तेलासाठी इतर देशांवरच अवलंबून आहे. देशाच्या 85 टक्के तेलाची गरज आयातीवर अवलंबून आहे. किंमतीत वाढ झाल्याने आता बाजारावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. केंद्र सरकारने कर कपात लागू केल्याने गेल्यावर्षी मे महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फेरबदल झालेला नाही. पण आता इंधनाच्या किंमती भडकण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसू शकतो.