मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीच्या 46 व्या एजीएममध्ये मोठी घडामोड घडली आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डावरुन राजीनामा दिला आहे. आता त्यांच्याजागी ईशा अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरआयएल बोर्डाने संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. नीता अंबानी बोर्डामधून बाहेर पडल्या आहेत. पण त्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेयरपर्सन पदावर कायम राहतील.
रिलायन्सच्या एजीएममध्ये रिलायन्स रिटेलच्या आयपीओ संदर्भात मोठी बातमी समोर येऊ शकते. मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये सांगितलं की, “मागच्या 10 वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने 150 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कुठल्याही कॉर्पोरेट ग्रुपकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे” असं त्यांनी सांगितलं.
रिलायन्सने वर्ष 2023 मध्ये किती लाख नोकऱ्या दिल्या?
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, वर्ष 2023 मध्ये रिलायन्सने 2.6 लाख लोकांना नोकरी दिली. त्यांनी सांगितलं की, सद्य स्थितीत रिलायन्समध्ये ऑनरोल कर्मचाऱ्यांची संख्या 3.9 लाख आहे. आम्ही जितक्या अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, ते प्रमाण कित्येक पटीने जास्त आहे.
रिलायन्सच नेट प्रॉफिट किती हजार कोटी?
रिलायन्सचा कंसोलिडेट रेवेन्यू 9,74,864 करोड़ रुपये आहे. वित्त वर्ष 2023 मध्ये रिलायन्सचा EBITDA 1,53,920 करोड़ रुपये होता. नेट प्रॉफिट 73,670 कोटी रुपये आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
दर 10 सेकंदाला एक 5 G नेटवर्क
भारतात चालू 5 जी सेलमध्ये जवळपास 85 टक्के नेटवर्क जियोच आहे. दर 10 सेकंदाला एक 5 G सेल जोडतोय. डिसेंबरमध्ये रिलायन्सचे 1मिलियन 5G सेल चालू होतील.