5G Spectrum News | भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा स्पेक्ट्रम लिलाव (5G Spectrum Auction) सोमवारी संपला. यात 5G दूरसंचार स्पेक्ट्रमची विक्रमी विक्री झाली. सात दिवस चालेल्या महालिलावात सरकारच्या तिजोरीत 1.5 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. या लिलावात अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओने (JIO)आघाडी घेतली. कंपनी सर्वाधिक बोली लावली. तर बोली लावण्यात एअरटेल (AIRTEL)दुसऱ्या क्रमांकावर होती. 4G तुलनेत या लिलावात दुप्पट रक्कम सरकारला मिळाली आहे. या लिलावात एकूण 1,50,173 कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. 5G दूरसंचार स्पेक्ट्रम अत्यंत हाय-स्पीड मोबाइल इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी सक्षम आहे. 5G स्पेक्ट्रमच लिलावाची रक्कम गेल्या वर्षी 4G लिलावाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी 4G लिलावातून 77,815 कोटी रुपये प्राप्त झाले होते. तर 2010 मध्ये 3G लिलावातून 50,986.37 कोटी रुपये मिळाले होते.यापेक्षा 5G दूरसंचार स्पेक्ट्रमच्या लिलावातून तिप्पट रक्कम मिळाली आहे. तर देशात आता 5G चा झंझावात येणार आहे. त्यामुळे अनेक उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.
5G दूरसंचार स्पेक्ट्रमच्या लिलावात रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली. कंपनीने 84,500 कोटींची बोली लावली. तर भारती एअरटेलने 46,500 कोटी रुपयांची तर व्होडाफोन आयडिया कंपनीने 18,500 कोटी रुपयांची अदानी समुहाने 900 कोटी रुपयांची बोली लावली.
या लिलाव प्रक्रियेत कोणत्या कंपनीने किती स्पेक्ट्रम विकत घेतले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सरकारने 10 बँडमध्ये स्पेक्ट्रम सादर केले होते, परंतु 600 मेगाहर्ट्स, 800 मेगाहर्ट्स आणि 2300 मेगाहर्ट्स बँडमध्ये स्पेक्ट्रमसाठी कोणतीही बोली प्राप्त झाली नाही, कोणीही या बँडसाठी बोली लावली नाही.
डिसेंबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु होईल. लिलावात सर्वाधिक बोली लावलेल्या कंपन्यांना देशात 5G सेवा सुरु करण्याचा परवाना मिळेल. हा परवाना 20 वर्षांसाठी असेल. साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत लिलावाचे वाटप होऊन सेवेसंबंची चाचणी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
5G तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना त्वरीत पीडीएफ पुस्तक, चित्रपट, अल्बम आणि इतर बऱ्याच गोष्टी त्वरीत डाऊनलोड करता येतील. तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीतही अमुलाग्र बदल होतील. झुम मिटींग्सपासून अनेक गोष्टीत त्याचा फायदा मिळणार आहे. आता व्हिडिओ, सिनेमा बफर होणार नाहीत, अडकणार नाहीत 2 जीबीचा चित्रपट अवघ्या 20 ते 25 सेकंदांत डाउनलोड करता येईल.
5G चा सर्वाधिक फायदा होणारे सेक्टर म्हणजे गेमिंग. या क्षेत्रात अमुलाग्र बदल होऊन व्यवसायाला सर्वाधिक स्कोप मिळणार आहे. येत्या 5 वर्षात 50 कोटींपेक्षा अधिक भारतीय 5G इंटरनेटचा वापर करतील असा अंदाज आहे.