जालना : पावसाने ओढ दिल्याचा परिणाम आता पेरणीनंतर अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. (Marathwada) मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये अल्प पावसाच्या जोरावर (Cereal crop) कडधान्याचा पेरा झाला होता. तर काही भागात धूळपेरणी केली होती. ज्या पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी हे धाडस केले होते त्या पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा अशी स्थिती निर्माण झाली. पेरणीपासून पाऊस गायब असल्याने शेतकऱ्यांवर आता (Re-Sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला होता पण कडधान्याच्या पेरणीला उशीर झाला तर उत्पादनावर परिणाम होतो म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले. पण आता उडीद, मूगाची वाढ खुंटली असून उगवण होताच पिकांनी माना टाकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली नाही तर पिकांची मोड अन्यथा दुबार पेरणी याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही.
दरवर्षी मराठवाड्यावर पावसाची अवकृपाच असते. त्यानुसार यंदाही जुलै महिना उजाडला तरी सरासरीऐवढाही पाऊस झालेला नाही. पेरणीची वेळ साधण्यासाठी शेतकऱ्यांनी कडधान्य जमिनीत गाढले पण त्यानंतरही पावसाने हजेरी लावलेली नाही. पावसाच्या भरवश्यावर जमिनीत ओल नसतानाही केलेला पेरा म्हणजेच धूळपेरणी. शेतकऱ्यांनी मोठा धोका पत्करुन हे धाडस केले पण आता दुबार पेरणीशिवाय पर्यायच उरलेला नाही. जालना जिल्ह्यात कडधान्याचा पेरा केवळ 40 टक्के क्षेत्रावर झालेला आहे. असे असतानाही या क्षेत्रावरील पिके तरली जातात की नाही याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात आहे.
हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे कडधान्यावर भर दिला होता. पावसाच्या जोरावर पिके तरतील अशी आशा शेतकऱ्यांना होती पण पावसाचा लहरीपणा चांगलाच अंगलट आला आहे. एकरी हजारो रुपये खर्ची करुनही मूग, उडीद हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीन आणि कापसाबाबत सावध पवित्रा घेत आहेत. सोयाबीनच्या पेऱ्याला उशीर झाला तरी उत्पादनावर परिणाम होत नाही याची कल्पना शेतकऱ्यांना असल्याने अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. खरीप हंगाम पावसावरच अवलंबून असल्याने बियाणे जमिनीत गाढण्यापूर्वीच शेतकरी योग्य ती खबरदारी घेत आहे. शिवाय कृषी विभागाचा सल्लाही शेतकरी आता मनावर घेत आहेत.
खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत.असे असले तरी यंदा यामध्ये बदल करावा लागला आहे. लांबलेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहानाला प्रतिसाद दिला असला तरी धूळपेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.