पुणे : (Cotton Crop) कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा लागवडीमध्ये वाढ होणार हे निश्चित आहे. असे असतानाही उत्पादकांना सर्वात मोठी धास्ती आहे ती (Bond Larvae) बोंड अळीची. बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात तर घट होतेच शिवाय इतर पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. आतापर्यंत एक ना अनेक उपाय समोर आले मात्र, धोका टळलेला नाही. त्यामुळे ‘मेटिंग डिस्टर्बन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करुन बोंड अळीला रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कापूस उत्पादित अशा 23 जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचाही समावेश आहे. यासाठी खासगी कंपनीशी करार करण्यात आली असून यंदाच्या (Kharif Season) हंगामापासून याला सुरवात होणार आहे.
बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गंधक रसायनाचा वापर केला जाणार आहे. हे गंधक झाडाच्या विशिष्ट भागात लावल्यानंतर मादी पतंगाच्या गंधाने नर याकडे आकर्षित होतील. पण त्याठिकाणी वारंवार जाऊन देखील मिलनासाठी मादी पतंग न मिळाल्याने ते परत येतील. त्यामुळे मिलन प्रक्रिया होणारच नाही शिवाय अंडी घालण्याच्या क्रियेमध्ये अडसर निर्माण झाल्याने नव्याने अळीची निर्मितीच होणार नसल्याची ही पध्दत आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक अशा 23 जिल्ह्यामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. ही प्रक्रिया किचकट असली तरी परिणामकारक ठरणार असल्याचा विश्वास कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जू. प्रसाद यांनी सांगितले आहे.
कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक ना अनेक पर्याय अवलंबून झाले आहेत. मात्र, हा धोका कायम असल्याचे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना प्राधान्य दिले आहे शिवाय फरदडचे उत्पादन न घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर फेरोमोन ट्रॅप व इतर पूरक उपयांच्या अंमलबजावणी करण्यात आली मात्र, धोका कायम असल्याने विविध उपययोजना राबवाव्या लागत आहेत.
सोयाबीन आणि कापूस हे खरिपातील मुख्य पिके आहेत. शिवाय गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला होता. मात्र, पावसाने ओढ दिल्याने आता कमी कालावधीत येणारे वाणाची लागवड केली जाणार आहे. अन्यथा सोयाबीनचे क्षेत्र वाढेल असाही अंदाज आहे. सध्या राज्यात पाऊस सक्रिय झाल्याने खरीप पेरणीला वेग आला आहे. आता कडधान्य नाही तर सोयाबीन आणि कापसाची लागवड केली जात आहे.