पुणे : उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांसाठी (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून केवळ नवनवीन योजनाच राबवल्या जात नाहीत तर आता मार्गदर्शन आणि पीक पध्दतीबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. खरीप हंगामात (Paddy Crop) धान पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल होत आहे. कुसगाव पमा येथे चारसूत्री पध्दतीने भात लागवड करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी थेट बांधावर दाखल झाले होते. या पध्दतीमुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण अधिकाऱ्यांच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन देखील मिळत आहे. या जनजागृतीमुळे चारसूत्री लागवडीला अधिक पसंती दिली जात आहे.
लागवडीपासून भात पिकाची योग्य ती काळजी घेतली तर उत्पादनात वाढ होणार आहे. सध्या खरीप हंगामातील भात लागवड सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच पध्दतीचा अधिक वापर करावा म्हणून कृषी विभागाचा आग्रह आहे. यामध्ये भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे.
चारसूत्री कार्यक्रमामुळे इंद्रायणी भाताचा वाण यांच पिकं मोठया जोमाने येते. त्यामुळे वेळीच शेतकऱ्यांनी निर्णय घेतला तर त्याचा फायदा हा पीक काढणीच्या दरम्यान लक्षात येणार आहे. सेंद्रिय पदार्थात वाढ होते. रोपे निरोगी व कणखर होतात. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. या पध्दतीचा अवलंब अधिकाधिक शेतकऱ्यांनी करावा यासाठी कृषी अधिकारी थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.
सध्या खरीप हंगामातील पिकांची लागवड सुरु आहे. असे असले तरी अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर,बोरिंग किंवा नदीच्या पाण्यावर चार सूत्री भाताची लागवड करावी लागत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही ठिकाणी शेतीची कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षित पावसाची प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याने उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.