महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 - मतदारसंघाची यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यातील 288 जागांवर एका टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यात आठवड्याभरात नवं सरकार स्थापन होणार आहे. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महायुतीत तीन पक्ष आहेत. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी. तर महाविकास आघाडीतही तीन पक्ष आहेत. एक म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी. या दोन्ही आघाड्यांना काही छोट्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. दोन्ही आघाड्या मजबूत स्थितीत आहे. महायुती राज्यात सत्तेत आहे. तर महाविकास आघाडी प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीतील लढत अत्यंत तुल्यबळ ठरणार आहे.
बंडानंतरची पहिली निवडणूक
राज्यात गेल्या पाच वर्षात दोन मोठी बंड झाली. एक म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. तर दुसरे म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीचे तर शरद पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आहेत. फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे विरुद्ध शिंदे आणि अजितदादा विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळणार आहे.
एकूण मतदार किती?
राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार आहेत. त्याशिवाय 1 लाख 16 हजार 355 सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात पहिल्यांदाच 20.93 लाख नवीन मतदार मतदान करणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना: 22 ऑक्टोबर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्ज छाननी : 30 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
मतमोजणी आणि निकाल : 23 नोव्हेंबर
प्रश्न उत्तर
प्रश्न - महाराष्ट्रात किती आघाड्या आहेत.
उत्तर - महाराष्ट्रात मुख्य दोन आघाड्या आहेत. एक म्हणजे भाजपच्या नेतृत्वातील महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी.
प्रश्न - महाविकास अघाडीत कोणते राजकीय पक्ष आहेत?
उत्तर - महाविकास अघाडीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आहे.
प्रश्न - महायुतीत कोणते राजकीय पक्ष आहेत?
उत्तर - महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आहे.
प्रश्न - यंदाच्या निवडणुकीतील वेगळेपण काय?
उत्तर - शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन तर शिवसेनेतही दोन गट झाले आहेत. आणि हे गट एकमेकांना निवडणुकीत आव्हान देणार आहेत. तसेच या चारही गटांच्या अस्तित्वाची परीक्षाच या निवडणुकीतून होणार आहे.
प्रश्न - महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष कोणता?
उत्तर - मागच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभेचे निकाल पाहता काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
प्रश्न: राज्यातील विधानसभेच्या जागा किती?
उत्तर: राज्यात एकूण 288 विधानसभेच्या जागा आहेत.
प्रश्न: राज्यात सरकार बनवण्यासाठी बहुमताचा आकडा किती?
उत्तर: राज्यात सरकार बनवण्यासाठी बहुमताचा आकडा 145 जागा आहेत.