Mumbai Crime : फेसबुकवरील मैत्री महागात पडली, लंडनवरुन आलेल्या भेटवस्तूंवरील कर देण्याच्या बहाण्याने लाखोंची लूट

| Updated on: Aug 01, 2023 | 9:27 AM

हल्ली सोशल मीडियावर मैत्री आणि लग्नाचे प्रस्ताव देऊन फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुलुंडमध्ये अशीच घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Crime : फेसबुकवरील मैत्री महागात पडली, लंडनवरुन आलेल्या भेटवस्तूंवरील कर देण्याच्या बहाण्याने लाखोंची लूट
फेसबुकवरील मित्राकडून महिलेची लाखोंची फसवणूक
Image Credit source: google
Follow us on

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : फेसबुकवर मैत्री करणे एका 43 वर्षीय चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तीने आधी मैत्री केली, मग लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर लंडनहून भेटवस्तू पाठवल्याचे सांगत कस्टम ड्युटी भरण्याच्या बहाण्याने महिलेची 88 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66C आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या बँक खात्याचा तपशील आणि फसवणूक करणाऱ्यांनी वापरलेले मोबाईल क्रमांक देखील महिलेने पोलिसांना दिले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मुलुंड येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. महिलेने ती स्वीकारली. सदर व्यक्तीने आपण लंडनमध्ये राहत असून, पेशाने पायलट असल्याचे महिलेला सांगितले. मग दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे रोज चॅटिंग करुन लागले. मग दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले.

काही दिवसांनी आरोपीने महिलेला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडितेनेही हा प्रस्ताव स्वीकारला. यानंतर आपण लवकरच तुझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात येणार असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. तसेच तो तिच्यासाठी सोन्याचा हार, डायमंड नेकलेस, आयफोन, लॅपटॉप, घड्याळ आणि यूके पौंड असलेले गिफ्ट पार्सल पाठवत असल्याचे सांगत तिचा पत्ता विचारला.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांनी महिलेला कस्टम अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने तिचे पार्सल आल्याचे सांगत कर आणि शुल्क भरण्यास सांगितले. पार्सल ताब्यात घेण्यासाठी विविध कराच्या बहाण्याने तिच्याकडून 88.54 लाख रुपये उकळले. मात्र पार्सल महिलेला मिळालेच नाही. त्यानंतर आरोपीने तिला फोन करुन वैद्यकीय मदतीच्या नावाखाली आर्थिक मदत मागितली.

यानंतर पीडितेला संशय आला. तिने आपल्या मैत्रिणीला ही बाब सांगितल्यानंतर मैत्रिणीने तिला सोशल मीडियावरील फसवणुकीची माहिती दिली. यानंतर पीडितेने मुलुंड पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.