Buldhana Crime : बहिणीशी फोनवर बोलला म्हणून अपंग तरुणाला संपवले, बुलढाणा हादरले !
बुलढाण्यात क्षुल्लक कारणातून हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक भयंकर घटना जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. अपंग तरुणाच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे.
बुलढाणा / 26 ऑगस्ट 2023 : बहिणीसोबत फोनवर बोलल्याच्या कारणातून एका अपंग तरुणाला मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चावरा इलोरा येथे ही घटना घडली. आकाश गोकुळ सोळंके असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाशच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. अर्जुन गजानन सोनोने आणि राजेश गुरुदेव सोनोने अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
आकाश हा आरोपीच्या बहिणीसोबत फोनवर बोलायचा. आरोपीला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आकाशच्या घरात घुसून त्याला माझ्या बहिणीशी फोनवर का बोलला असं जाब विचारत आरोपी आणि त्याच्या साथीदाराने आकाशला बेदम मारहाण केली. आकाशचे आई वडील हे शेतात कामासाठी गेले होते. संध्याकाळी शेतीचे कामे आटपून घरी आले असता त्यांना त्यांचा अपंग मुलगा आकाश हा जखमी अवस्थेत घरात पडलेला दिसून आला. त्याच्या तोंडातून रक्त निघत होते. तसेच त्याच्या संपूर्ण शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या.
आई-वडील घरी आल्यानंतर घटना उघड
आई-वडिलांनी आकाशला विचारणा केली असता, त्याने गावातील अर्जुन सोनोने आणि राजेश सोनोने या दोघांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले. दरम्यान, आकाशाची तब्येत जास्त खालावल्याने त्याच्या पालकांनी त्याला जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मारहाणीमुळे अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत आकाशच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी अर्जुन गजानन सोनोने आणि राजेश गुरुदेव सोनोने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पुढील तपास सुरू आहे.