sanjay raut lok sabha election : संजय राऊत ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?; राजकीय हालचालींना प्रचंड वेग
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं वृत्त आहे. राऊत हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतूनच ते निवडणुकीला उभे राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ठाकरे गटाचे नेते, राज्यसभेतील सदस्य संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ठाकरे गटासह महाविकास आघाडीत जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याचं सांगितलं जात आहे. राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल असं सांगितलं जात आहे.
संजय राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ठाकरे गटाकडून त्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देण्याचं घटत आहे. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राऊत यांनी निवडणूक लढवल्यास संजय राऊत यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल. तसेच ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. संजय राऊत यांनी आधी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवावी आणि मग आमच्यावर टीका करावी, अशी टीका शिंदे गटाकडून सातत्याने केली जात आहे. राऊत प्रत्यक्षात लोकसभेच्या मैदानात उतरल्यास शिंदे गटाला एक प्रकारे उत्तर मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
त्यामुळे निर्णय होऊ शकतो
इंडिया आघाडीने देशभरात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचा हा फॉर्म्युला सर्वच घटक पक्षांना बंधनकारक असणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही एकास एक उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राऊत यांनाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय ठाकरे गटातील 13 खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे मातब्बर नेत्यांची वाणवा आहे. त्यामुळेही राऊत यांना ठाकरे गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राऊत यांना काय वाटतं?
संजय राऊत यांना ते लोकसभा निवडणूक का लढवत नाहीत? असं अनेकदा खासगीत विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी माझ्यावर पक्षाची व्यूहरचना करण्याची जबाबदारी आहे. इतर उमेदवारांचा प्रचार करून त्यांना बळ देण्याची जबाबदारी आहे. मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर एका मतदारसंघात अडकून बसेल. त्यामुळे पक्षाच्या व्यूहरचनेकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्याचा पक्षाला फटका बसू शकतो, असं राऊत यांचं म्हणणं आहे.