मोठी बातमी! समीर वानखेडे यांच्या बहीण आणि वडिलांची चौकशी होणार, कारण…
समीर वानखेडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. सीबीआयने नुकतंच वानखेडे यांची सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर आता सीबीआय वानखेडे यांच्या कुटुंबियांचीदेखील चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबद्दल पुन्हा एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समीर वानखेडे यांच्या बहीण आणि वडिलांची उद्या सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोघांची मुंबईच्या सीबीआय कार्यालायत चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर वानखेडे हे सीबीआय चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांची दोनवेळा तासंतास सीबीआय चौकशी पार पडल्यानंतर आता सीबीआय त्यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेणार आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांना येत्या 8 जूनपर्यंत हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळालं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांची सलग दोन दिवस चौकशीदेखील केली. त्यानंतर आता सीबीआय समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांची चौकशी करणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 10 वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयात सीबीआय चौकशीसाठी जाणार आहेत. सीबीआयचे पथक दोघांचा जबाब नोंदवून घेणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समीर वानखेडे यांच्या घरावरही छापा
विशेष म्हणजे सीबीआय अधिकारी या प्रकरणात चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर एका पथकाने थेट समीर वानखेडे यांचं मुंबईतील घर गाठत छापा टाकला. या छाप्यातून सीबीआय अधिकाऱ्यांना नेमकी काय माहिती मिळाली, याबाबतची सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. पण वानखेडे यांच्याशी संबंधित आणखी काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
समीर वानखेडे यांची दिल्ली हायकोर्टात धाव
सीबीआयकडून कारवाई सुरु झाल्यानंतर समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. आपण देशभक्त असल्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागत असल्याचा युक्तिवाद वानखेडे यांच्याकडून कोर्टात करण्यात आला. दिल्ली हायकोर्टाने समीर वानखेडे यांना या प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही काळासाठी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी होऊ शकली नाही.
वानखेडेंना अटकेपासून संरक्षण
दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत वानखेडे यांच्याकडून आपण सीबीआयला चौकशीत सहकार्य करु. पण आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं, असा युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने वानखेडे यांची मागणी मान्य करत अटकेपासून संरक्षण दिलं. त्यानंतर वानखेडे यांची सलग दोन दिवस चौकशी पार पडली.