Jalgaon Accident : ओव्हरटेकच्या नादात ओमनीची रिक्षाला धडक, एक ठार तर सात गंभीर जखमी
बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जळगावमध्ये ओव्हरटेकच्या नादात अपघाताची घटना घडली. यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मागणी होत आहेत.
जळगाव / 24 ऑगस्ट 2023 : ओव्हरटेकच्या नादात ओमनी गाडीने रिक्षाला धडक दिल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. या धडकेत रिक्षा पलटी होऊन रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. दादाराव किसन सुरवाडे असे मयत व्यक्तीचे नाव असून, ते पळसखेडा येथील रहिवासी आहेत. बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड वाकी फाट्याजवळ हा अपघात झाला. रिक्षाला धडक दिल्यानंतर ओमनी चालक पळून गेला. जखमींना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जीवन कडु सुरवाडे यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
जामनेर रोडवर शेलकी वाकी फाट्याजवळ जामनेरकडे भरधाव वेगात ओमनी गाडी चालली होती. तर अॅपे रिक्षा विरुद्ध दिशेने येत होती. आरोपी चालक त्याच्या पुढे चाललेल्या दुसऱ्या ओमनीला ओव्हरटेक करत होता. यावेळी ओव्हरटेकच्या नादात तो रस्त्याच्या चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या अॅपे रिक्षाला धडकला. रिक्षाला धडकल्याने रिक्षाचालक प्रदीप राठोड यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे रस्त्याच्या खाली पलटली.
अज्ञात रिक्षाचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु
रिक्षा पलटल्याने रिक्षातील दादाराव सुरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील इतर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ओमनी चालकाने पळ काढला. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अज्ञात ओमनी चालकाचा शोध घेत आहेत.