Buldhana Accident : दूधाचा टँकर आणि नारळाच्या ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी
बुलढाण्यात अपघातसत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. जिल्ह्यात दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यामुल रस्ते सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुलढाणा / 15 ऑगस्ट 2023 : सोलापूर-इंदूर महामार्गावरील मलकापूर तालुक्यातील घुस्सर फाट्यानजीक नारळाने भरलेला ट्रक आणि दुधाच्या टँकरची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती, की यामध्ये नारळाच्या ट्रकला आग लागली. या घटनेत दोन्ही चालकांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे ट्रकला आग लागल्याने ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश ब्रिजलाल पाटील असे मृत टँकर चालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
अपघातानंतर ट्रकला आग लागल्याने दोघे होरपळले
अपघातग्रस्त दुधाचा ट्रक हा अमर दूध डेअरीच्या असल्याचे त्यावर लिहिले होते. दूध ट्रक हा मलकापूरकडून बुलढाण्याच्या दिशेने जात होता. तर बुलढाणाकडून मलकापूरच्या दिशेने येत असलेले नारळाने भरलेला ट्रक यांच्यामध्ये घुस्सर फाट्याजवळ जोरदार धडक झाली. या धडकेने नारळाच्या भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली.
या आगीत ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर वाहक हा गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दुधाच्या ट्रकचा चालक गणेश ब्रिजलाल पाटील याचाही या घटनेत मृत्यू झाला आहे.
ट्रकला आग लागल्यावर स्थानिक नागरिकांनी मृतकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मलकापूर येथील अग्नीशमन दलालाही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून ट्रकला लागलेली आग विझवली.