‘नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची…’, मनसे नेत्याने आदित्य ठाकरे यांना सुनावलं
आदित्य ठाकरे यांनी काल टोलनाके बंद करण्याची मागणी केली. रस्त्यांचं मेंटेनन्स महापालिका करतयं तर तिथल्या टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? असा सवाल त्यांनी विचारला होता.
मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्गावरील टोलनाके बंद करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रूतगती मार्ग महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्याचा मेंटनन्स महापालिका करते. तरीही या दोन्ही मार्गावरील टोलचा पैसा एमएसआरडीसीकडे जातो. या रोडवरील जाहिरातीचा पैसाही एमएसआरडीसीकडे जातो.
ही फार मोठी रक्कम आहे, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. या दोन्ही मार्गावरील टोलनाके बंद करा आणि तो पैसा महापालिकेला द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय?
पालिका या दोन्ही रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी गोष्टी करते. पालिकेच्या खर्चातूनच या गोष्टी होतात. महापालिका मुंबईकरांकडून कर घेते. या कराच्या पैशातून या रस्त्याची डागडुजी आणि देखभाल केली जाते. या दोन प्रमुख रस्त्यांचं मेंटेनन्स महापालिका करतयं तर तिथल्या टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? असा आदित्य ठाकरे यांचा सवाल आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं…
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 8, 2023
‘आम्ही बोलत नाही करुन दाखवतो’
टोलनाके बंद करण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आदित्य ठाकरे यांना काही गोष्टींची आठवण करुन दिली आहे. “राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर 65 टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं बोलू नका, आमच्यासारखी करुन दाखवायची हिंमत ठेवा” असं अमेय खोपकर यांनी सुनावलं आहे. अमेय खोपकर मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख आहेत.