श्रद्धा वालकर सारखंच हत्याकांड, प्रेयसीचे तुकडे केले अन् कुकरमध्ये… मीरा रोडमधील हत्याकांडाने सर्वच हादरले
मीरा रोड येथे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेची तीन ते चार दिवसापूर्वीच हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मीरा रोड : दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखंच हत्याकांड मीरारोडमध्ये घडलं आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रेयसीचाच खातमा केला. तिचा जीवे मारल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. तिच्या शरीराचे काही भाग घरातच टाकले. तर काही भाग इतरत्र नेऊन नेस्तनाबूत केले. मात्र, घरातील दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून या माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
मीरा रोड येथील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे धक्कादायक हत्याकांड घडलं आहे. गीता आकाशदीप सोसायटीतील सातव्या माळ्यावर मनोज साहनी (वय 56) आणि सरस्वती वैद्य एकत्र राहत होते. दोघेही लिव्ह इनमध्ये होते. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे या सोसायटीत भाड्याने राहत होते. मात्र, दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
फ्लॅटचा दरवाजा तोडताच
मनोजच्या घरातून दुर्गंधी येत होती. घराला टाळं होतं. त्यामुळे दुर्गंधी का येते? असा संशय शेजाऱ्यांना आला. शेजाऱ्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत घुसताच दुर्गंधीचा आणखी भपका आला. आत घुसल्यावर पोलिसांना घरात मानवी शरीराचे तुकडे दिसले. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. यावेळी त्याने सरस्वतीचा खून केल्याची कबुली देत ते तुकडे तिच्या शरीराचेच असल्याचं सांगितलं.
त्यानंतर त्याने…
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि सरस्वतीचं भांडण झाल्यानंतर मनोजने रागाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तो बाजारात गेला. तिथून त्याने चेनशॉ (झाड कपाणारी मशीन) आणली. त्यानंतर त्याने या मशीनच्या सहाय्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. काही तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून उकळले. त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून असं केलं असावं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
तीन ते चार दिवसांपूर्वी हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची तीन ते चार दिवसांपूर्वीच त्याने हत्या केली असावी. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे एकत्र केले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच घटनास्थली फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आळं होतं. फ्लॅटमधील इतर पुरावेही गोळा केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच फ्लॅट सील करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
बोरिवलीत दुकान
दरम्यान, मनोज हा बोरिवली परिसरात एक दुकान चालवत होता. त्याची कशाचे दुकान होते याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच या हत्याकांडात त्याला अन्य कुणी मदत केली का? याचीही चौकशी केली जात आहे. शिवाय सरस्वती वैद्य हिच्या कुटुंबीयांचाही पोलीस शोध घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.