मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : केंद्रातील मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये घोटाळा झाला आहे. आयुष्यमान भारत योजनेसह सात योजनांमध्ये हा घोटाळा झाल्याचा कॅगचा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आता मोदींनी या विषयावर मौन सोडावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कॅगने चक्क मोदी सरकारचा घोटाळा काढला आहे. आता कॅगवर ईडीच्या धाडी मारल्या पाहिजेत. कॅगची घोटाळा बाहेर काढण्याची हिंमतच कशी झाली? असा उपरोधिक टोला काँग्रेसने लगावला आहे. तर कॅगला देशद्रोही ठरवा, असा चिमटा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काढला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कॅगवर ईडीच्या धाडी घाला. द्वारका, यमुना एक्सप्रेस वेमध्ये एक किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये घोटाळे झाले आहेत. आता कॅगला देशद्रोही ठरवा. त्यांनी तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही भीती आहे. सरकारमध्ये पराभवाची भीती आहे. ये डर अच्छा आहे. हे सरकार कोणतीही निवडणूक घेत नाही. मुंबईसारख्या शहराला महापौर नाही, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे शहरात महापौर नाही. कारण त्यांना पराभूत होण्याची भीती वाटत आहे. महापौरांशिवाय हे शहर असेच ठेवलं आहे. महापौर हे शहराचं कुंकू आहे. सौभाग्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.
पुणे आणि चंद्रपूरच्या दोन पोटनिवडणुका बाकी आहेत. तरीही निवडणुका घेत नाहीत. कारण त्यांना जिंकण्याची शाश्वती वाटत नाही. त्याचा अर्थ तुम्ही लोकसभा पराभूत होणार म्हणून लोकसभेची निवडणुका घेणार नाही का? विधानसभा हरणार म्हणून लोकसभा घेणार नाही का? आम्ही सिनेटची तयारी सुरू केली आहे. आम्ही जिंकणार आहोत आणि तुम्ही निवडणूक बरखास्त केली. ही कोणती लोकशाही आहे? असा सवाल त्यांनी केला.
सिनेटची निवडणूक रद्द केली. यात धक्का बसावा असं काही नाही. या राज्यातील सरकार कोणतीही निवडणूक भीतीपोटी घ्यायला तयार नाही. आमचं पॅनल शंभर टक्के जिंकणार होतं. या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या, मी म्हणतो किती निवडणुका रद्द करणार आहोत? शिवसेना जिंकेल म्हणून महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. तुम्ही कुठेच निवडणुका घेत नाही. कारण भाजप हरण्याची भीती वाटत आहे. या भीतीपोटी ठरलेल्या लोकसभा आणि विधानसभा घेणार नाहीत का? या भीतीपोटी तुम्ही लोकशाहीचा गळा घोटत आहात, अशी टीका त्यांनी केली.